आणि “ट्विटर” मुळे ओळख मिळाली.. दयानंद कांबळे माहिती उपसंचालक दिल्ली.

आठवणींना उजाळा

सन २०१० च्या मे महिन्यातील ती गोष्ट असेल. मी त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचा जिल्हा माहिती अधिकारी या पदावर कार्यरत होतो. त्यावेळी मी जनसंपर्क नव्या माध्यमांशी आणि नव्या तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयोग केला होता. शासनात सर्वप्रथम “मोबाईल गवर्नेन्स” ( M- Governence ) चा मी प्रयोग केला आणि एसएमएस च्या माध्यमातून देशभर महत्वाच्या बातम्या देण्यास सुरुवात झाली. पुढे “ई – वृत्त सेवा” हा उपक्रम सुरू केला, या उपक्रमातून व्हिडिओ, ऑडियो तसेच बातम्या याची सुविधा इलेक्ट्रॉनिक तसेच मुद्रित माध्यमासाठी सुरू केली. या एकूणच उपक्रमाची दखल लोकसत्ता सारख्या वृत्तपत्रांनी आणि दूरदर्शन ने घेतली. एकूणच या प्रोत्साहनामुळे मी पुढचे पाऊल उचलले ते ट्विटर वर शासनाच्या बातम्या ट्विट करण्याचे……

Advertisements

मे २०१० साली मी कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाचे ट्विटर हॅण्डल सुरू केले. आणि ट्विट करण्यास सुरुवात केली. कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालय “मोबाईल गवर्नेन्स” आणि “ई – वृत्त सेवा” या उपक्रमां नंतर आता ट्विटर वर शासनाच्या बातम्या देण्यास सुरुवात करीत आहे, हे सांगण्यासाठी मी जेंव्हा वरिष्ठांना फोन केला, तेंव्हा अक्षरशः वरिष्ठांनी माझी चक्क खरडपट्टी केली.. ते म्हणाले..” ट्विटर की फिटर हे काय आपले काम आहे का… नसते उद्योग तू कश्याला करतोस.. तत्काळ ते तुझे ट्विटर की फीटर बंद कर आणि आम्हाला रिपोर्ट कर.. ” असा दमादेश आल्यानंतर मी ट्विटर बंद केले आणि वरिष्ठांना कळविले…

पुढे मी सन २०१३ मध्ये नवी दिल्ली येथे उपसंचालक पदावर रुजू झालो आणि तिथे मी “महाराष्ट्र परिचय केंद्राचे” तीन भाषेत ट्विटर हॅण्डल सुरू केले. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय मधील ते पाहिले ट्विटर हॅण्डल ठरले आणि मग पुढे सर्वच जिल्हा आणि विभागीय माहिती कार्यालयाचे ट्विटर हॅण्डल सुरू झाले. ज्यावेळी मी कोल्हापूर येथे जिल्हा माहिती अधिकारी या पदावर कार्यरत ( २०१० ) होतो त्यावेळी मी माझे कार्यालय आणि माझे वैयक्तिक ट्विटर सुरू केले होते, परंतु वरिष्ठांच्या “दमादेश” यामुळे मी कार्यालयाचे ट्विटर हॅण्डल बंद केले पण माझे हँडल मात्र सुरू ठेवले ते आजतागायत सुरू आहे आणि ते वेरिफिएड देखील आहे.

हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे, आज माननीय मंत्री श्री आदित्य ठाकरे हे आज माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित “दिलखुलास” आणि “जय महाराष्ट्र” या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंग साठी आमच्या कार्यालयाच्या स्टुडिओ मध्ये आले तेंव्हा मी त्यांना भेटलो आणि म्हणालो..”सर मी दयानंद कांबळे…” पुढे परिचय करून देण्या आधीच आदित्य ठाकरे साहेब* म्हणाले, “कांबळे साहेब मी तुम्हाला ट्विटर मुळे तुम्हाला ओळखतो…” त्यांचे हे शब्द मला इतके सुखावून गेले की सन २०१० साली, ज्या वरिष्ठांनी मला यासाठी “दमादेश” दिला होता त्याची कालांतराने का होईना “चीज” झाले होते.

माननीय आदित्य ठाकरे साहेब आपले शतशः धन्यवाद…

दयानंद कांबळे
उपसंचालक ( वृत्त )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *