सामाजिक बांधिलकी जपत कोल्हापुरातील चार कॉलेज विद्यार्थिनींनी पुढाकार घेत शहरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उभारलं वॉटर एटीएम..

कोल्हापूर/प्रतिनिधी : त्या चौघीही कॉलेजकुमारी आहेत, पण सामाजिक भान असणाऱ्या या चौघींनी नुसतं कॉलेज आणि अभ्यास या पलीकडं जात सामाजिक बांधिलकी जपण्याचं मोठ काम केलं आहे. सरकारी रुग्णालयात येणाऱ्या अतिशय सर्वसामान्य रुग्णांना आणि नातेवाईकांना नाममात्र पैशात स्वच्छ पाणी मिळावं म्हणून त्यांनी  वॉटर एटीएम उभारलं आहे. येत्या प्रजासत्ताकदिनी हा प्रकल्प सुरू होत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीनं हा प्रकल्प साकारला असला तरी पुढाकार घेणाऱ्या कोल्हापूरच्या चार लेकी आहेत.

गेल्या वर्षी कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली होती. रोज कोल्हापुरात चार ते पाच हजार बांधितांची भर पडत होती. छत्रपती प्रमिलाराजे सरकारी रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना दाखल करण्यात येत होते. रुग्णांच्या नातेवाईकांची रोजची परवड दूर करण्यासाठी चार मुली पुढे आल्या. त्यांनी समाजातून देणगी जमा करत मोफत नाष्टा सेंटर सुरू केले. खिशात पैसे नसलेल्या नातेवाईकांना मोठा आधार मिळाला. श्रुती चौगुले, अर्पिता राऊत, श्रेया चौगुले आणि आचल काट्यारी याच त्या चौघी. चौघीही सर्वसामान्य कुटुंबातील. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या या चौघींनी केलेल्या उपक्रमाचे कोल्हापुरात मोठे कौतुक झाले.

Advertisements

मोफत नाष्टा देताना नातेवाईक आणि रुग्णांचे पाण्यावर फार पैसे खर्च होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शुद्ध पाणी म्हणून पाण्याच्या बाटल्या विकत घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असल्याने त्यांनी सीपीआर रूग्णालयातच वॉटर एटीएम सुरू करण्याचा निर्धार केला. अनेकांना भेटून, आवाहन करून त्यांनी काही रक्कम जमा केली. दानशूर व्यक्तींच्या मदतीतून दोन लाखांचा निधी जमा झाला. यामधून हा प्रकल्प साकारला आहे. स्वच्छ आणि गरम पाण्याचाही पुरवठा यामधून होणार असून केवळ एक ते दोन रुपये लिटर अशा माफक दरात ते नातेवाईक आणि रुग्णांना मिळणार आहे. येत्या प्रजासत्ताक दिनी त्याची सुरुवात होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *