कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक असलेली इयत्ता बारावीची लेखी परीक्षा शुक्रवार ४ मार्च २०२२ पासून सुरू होत आहे. परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. सुमारे १५ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. करोना काळानंतर प्रथमच राज्यभरात इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा देणार आहेत.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची लेखी परीक्षा (HSC Exam २०२२) शुक्रवार ४ मार्चपासून सुरू होत आहे. राज्यातून एकूण १४,८५,८२६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. करोना महामारीमुळे मागील वर्षी दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. करोना काळानंतर प्रथमच राज्यभरात इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा देणार आहेत. या दृष्टीने या परीक्षेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेसंबंधीचे माहिती देणारे परिपत्रक जाहीर केले आहे. यानुसार, राज्यात २,९९६ मुख्य केंद्र आणि ६,६३९ उपकेंद्रे अशा एकूण ९,६३५ केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी मंडळामार्फत प्रसिद्ध केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.
“कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर यंदाच्या परीक्षेसाठी पुढील महत्त्वाचे बदल-“
– नेहमीपेक्षा सुमारे १५ दिवस उशिराने परीक्षेचे आयोजन
– शाळा-ज्यु. कॉलेज स्तरावर परीक्षेचे केंद्र-उपकेंद्र
– ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षा
– ४० टक्के प्रात्यक्षिकांवर आधारित परीक्षेचे नियोजन
– लेखी परीक्षेच्या ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे अधिक वेळ, ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे जादा वेळ