विशेष वृत्त,अजय शिंगे-
मोहाली : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. चार मार्च रोजी दोन्ही संघातील पहिली कसोटी आयएस बिंद्रा क्रिकेट मैदानावर होणार आहे. ही कसोटी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची १००वी मॅच असणार आहे. विराट या लढतीला ऐतिहासिक करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्याने नोव्हेंबर २०१९ नंतर शतक झळकावले नाही. आता या सामन्यात शतकांचा दुष्काळ संपवण्याचा तो नक्की प्रयत्न करले. पण श्रीलंकेच्या संघातील काही गोलंदाज त्याच्यासाठी अडचणीचे ठरू शकतात. जाणून घेऊयात असे कोणते खेळाडू आहेत जे विराटच्या स्वप्नांवर पाणी फेरू शकतात.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ९ फलंदाजांना १००व्या कसोटीत शतक झळकावता आले आहे. तर एकाही भारतीय फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे ऐतिहासिक कामगिरी करण्याची मोठी संधी विराटकडे आहे. जर कोहलीने १०० व्या कसोटी सामन्यात शतक झळकावले, तर तो नवा इतिहास रचेल. २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून कोहलीने कसोटी पदार्पण केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सातव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर पोहोचली होती.
मोहालीमध्ये विराट कोहलीचे रेकॉर्ड-
विराटने या मैदानावर आतापर्यंत या मैदानावर ३ कसोटीत ५०च्या सरासरीने १९९ धावा केल्या आहेत. या मैदानावरील त्याची सर्वोच्च धावसंख्या ६७ आहेत. दोन वेळा त्याने ५० हून अधिक धावा केल्या आहेत.
श्रीलंकेविरुद्ध विराट कोहलीचे रेकॉर्ड-
विराटने श्रीलंकेविरुद्ध ९ कसोटीत १ हजार ४ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ५ शतक आणि २ अर्धशतकांची नोंद आहे.