Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी:
दि. २५ रोजी दुपारी ४.०० वाजता वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात गगनबावडा ३३/११ केव्ही उपकेंद्र परिसरात वीज पडल्याने उपकेंद्रातील ५ एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरस्त झाला. तो ट्रान्सफॉर्मर २१ तासाच्या अथक परिश्रमानंतर जागेवरच दुरुस्ती करण्यात महावितरणला यश आले. त्यामुळे गगनबावड्यासह परिसरातील वीस गावातील सुमारे साडेचार हजार वीज ग्राहकांची गैरसोय टळली.
कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा हा अतिदुर्गम भागात वसलेला तालुका आहे. कोकणचे प्रवेशव्दार असलेला हा तालुका तेथील जैवविविधतेच्या बळावर ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून उदयास येतो आहे. पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या भागातील वीज सेवेवर महावितरणचे विशेष लक्ष आहे. दि. २५ रोजी दुपारी ४.०० वाजता गगनबावडा उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने महावितरण यंत्रणेवर चिंतेचं धुकं पसरलं. कारण पॉवर ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करण्यासाठी थेट कोल्हापूर गाठण्याशिवाय पर्याय नाही,अशी स्थिती आहे. त्यात पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या वाहतूकीचा, दुरुस्तीचा वेळ लक्षात घेतला तर किमान तीन दिवसांचा कालावधी लागणार होता. तात्पुरती पर्यायी व्यवस्था म्हणून जयसिंगपूरहून पॉवर ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था करावी लागणार होती. या सगळ्या प्रक्रियेत वीज ग्राहकांची गैरसोय अटळ होती. अशा परिस्थितीत संकटातून मार्ग काढणार नाहीत, ते महावितरणचे कर्मचारी कसले. स्थानिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले कसब पणास लावले.
पॉवर ट्रान्सफॉर्मरची पाहणी केली. नेमकेकाय बिघाड झाले आहेत हे प्रथम दर्शनी पाहिले.रात्रीच्या वेळीच पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या तपासणीसाठी जनरेटर उपलब्ध करण्यात आला. कोल्हापूरच्या चाचणी विभागाच्या पथकास तातडीने पाचारण करण्यात आले. पथकाने तपासणी कामास सुरुवात केली. उपकेंद्रास येणाऱ्या ३३ केव्ही वाहिनीच्या खांबावरील बी फेज पिनइन्सुलेटर, पोस्ट इन्सुलेटर(हॉर्नगॅपचा), वाय फेजचा लाईटनिंग अरेस्टर फुटला होता. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे वाय फेजचे बुशिंग तुटलेले होते व ऑईल गळती सूरु होती.
सकाळी लवकरच दुरस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली. स्थानिक वीज कर्मचाऱ्यांनी मे. विद्युत इंजिनिअर्सच्या सहाय्याने सलग सहा तास दुरुस्तीचे काम केले. त्यानंतर चाचणी विभागाच्या पथकाने तपासणी केली. तपासणीअंती सारे निकष समाधान कारक आढळून आले. दि. २६ रोजी दुपारी ०१.१२ वाजता पॉवर ट्रान्सफॉर्मर यशस्वीपणे चालू करण्यात आला. अन् गगनबावडा परिसराचा वीजपुरवठा सुरळीत झाला.
अधीक्षक अभियंता मा. अंकुर कावळे ,कार्यकारी अभियंता दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गगनबावड्याचे उपविभागीय अभियंता विनायक जाधव, चाचणी विभागाच्या उपकार्यकारी अभियंता सविता लोहार,सहाय्यक अभियंता अभिनंदन कोळेकर, शाखा अभियंता अश्विन सुर्यवंशी, सहाय्यक यंत्रचालक हेमंत घाडगे, प्रधानतंत्रज्ञ सुनिल माळी व सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली. याबद्दल मुख्य अभियंता मा. परेश भागवत यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.