कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२९ : सखी वन स्टॉप सेंटर कडून महिलांना तात्काळ मदत मिळवून द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.
महिला व बालविकास विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली, यावेळी त्यांनी सूचना केल्या. बैठकीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा आंबले आदी उपस्थित होते.
सखी सेंटरकडे प्राप्त होणाऱ्या प्रकरणांवर कार्यवाही करताना तक्रारदारांची माहिती अद्ययावत ठेवा, विविध शासकीय यंत्रणांची आवश्यकते प्रमाणे मदत घ्या, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी केल्या. पीडित व गरजू महिलांना तात्काळ मदत मिळण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरु ठेवा, असे सांगून प्राप्त प्रकरणांची माहिती अद्ययावत ठेवा तसेच एफआयआर झाल्यास या प्रतींचे रेकॉर्ड ठेवा,असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी सखी वन स्टॉप सेंटर च्या जिल्हा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत केंद्राकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा आढावा घेतला. सखी सेंटरकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी, यावर तात्काळ सेवा, मदत उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक असणारी कार्यवाही तसेच दिलेली मदत कशाप्रकारे उपयुक्त ठरते याबाबतचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
सखी सेंटरकडे जानेवारी ते मार्च २०२२ या अहवाल कालावधीतील ९ प्रकरणे प्राप्त झाल्याचे केंद्र प्रशासकांनी सांगितले.
बैठकीस सखी केंद्राकडे प्राप्त प्रकरणांना कशा प्रकारे मदत केली जावी, याबाबत जिल्हा संरक्षण अधिकारी संजय चौगले यांनी माहिती दिली. बैठकीला जिल्हा बार असोसिएशन प्रतिनिधी, जिल्हा विधी सेवा प्रतिनिधी उपस्थित होते.