कोल्हापूर/प्रतिनिधी :
कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा रोवला असून अशी कामगिरी करणारी कस्तुरी ही पहिली कोल्हापूरकर बनली आहे. आज तिच्यासह जगभरातील वीस गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केले असून या टीममध्ये ती एकमेव भारतीय आहे.
रणरागिणी महाराणी ताराराणी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कर्तृत्वाचा वारसा सांगणाऱ्या आपल्या कोल्हापुरातील कुस्तुरीने एवढ्या लहान वयात अशी सुवर्ण कामगिरी केल्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन! गेल्या वर्षी एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेल्या कस्तुरीला खराब हवामानामुळे अगदी काही अंतरावरून खाली यावे लागले होते. मात्र, त्यामुळे न खचता तिने पुन्हा तयारी केली आणि ही मोहीम पूर्ण करून इतिहास रचत कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
गेल्या महिन्यात तिने ८०९१ मी. उंची असलेले अन्नपूर्णा शिखर सर करत जगातील सर्वात कमी वयाची महिला होण्याचा बहुमान मिळवला होता.