सचोटी व प्रामाणिकपणाने व्यापार उद्योग करून जीवनात यशस्वी व्हा : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर/प्रतिनिधी : 

मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत सचोटी व प्रामाणिकपणाने व्यापार -उद्योग करून जीवनमान उंचवा, अशी प्रेरणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. या माध्यमातून आर्थिक स्थैर्य आल्यानंतर मुलाबाळांचे शिक्षण चांगले करून त्यांचेही भवितव्य घडवा, असेही ते म्हणाले.कागलमध्ये मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत बेरोजगार महिला व युवकांना २५ फिरत्या उद्योग केंद्रांचे वाटप झाले. या कार्यक्रमात हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

Advertisements

यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवउद्योजकांना ७५ लाख रुपये अनुदानाचे वाटप झाले. यावेळी भाषणात हसन मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली महत्त्वकांक्षी अशी ही मुख्यमंत्री रोजगार योजना आहे. या योजनेमध्ये मागासवर्गीय घटक आणि सर्वच महिलांना ३५ टक्के अनुदान आहे. सर्वसाधारण गट, ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातीला २५ टक्के अनुदान आहे.

“तुम्हीही धीरूभाई अंबानी बना……!”

हसन मुश्रीफ म्हणाले, नामवंत उद्योगपती स्वर्गीय धीरूभाई अंबानी हे एकेकाळी पेट्रोल पंपावर पेट्रोल घालण्याच्या कामावर होते. ते जगात तेराव्या क्रमांकाचे आणि देशात एक नंबरचे श्रीमंत व्यक्ती ठरले. त्यामुळे कोणत्याही व्यवसायाला कमी लेखू नका. कठोर परिश्रमातून तुम्हीही धीरूभाई अंबानी बना, असेही ते म्हणाले.केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, बेरोजगारांच्या हाताला काम देऊन रोजगार वाढविण्यामध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे नेहमीच अग्रभागी राहिले आहेत.       

माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, कुठेतरी एका मागासवर्गीय तरुणाला बँकेचे कर्ज देऊन समरजीत घाटगे फार मोठा डांगोरा पिटत आहेत. हसन मुश्रीफ यांनी किती गंगाराम कांबळे उभे केले? असा सवाल विचारत आहेत. या पद्धतीने हसन मुश्रीफ यांनी हजारो गंगाराम कांबळे उभे केले आहेत, असेही ते म्हणाले.        

स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात “माझा व्यवसाय -माझा हक्क” अभियानाचे समन्वयक सचिन पवार यांनी मुख्यमंत्री रोजगार योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी बाबासो नाईक, नितीन दिंडे, प्रवीण काळबर, नामदेवराव पाटील – मळगेकर, नवाज मुश्रीफ, विवेक लोटे, बच्चन कांबळे, संजय चितारी आदी प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *