कोल्हापूर, ता. १२ : मराठी चित्रपटसृष्टीत आशयप्रधान आणि थरारक विषय हाताळणाऱ्या चित्रपटांची परंपरा आता अधिक बळकट होताना दिसत आहे. त्याच धाटणीतील साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘मिशन’ हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट येत्या १५ मे रोजी राज्यभर प्रदर्शित होत असून, चित्रपटाच्या कथानकानेच प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेची कमाल निर्माण केली आहे.
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांनंतर वापरण्यात आलेल्या ३०० किलो आरडीएक्सपैकी १०० किलोचा वापर झाला, मात्र उर्वरित २०० किलो आरडीएक्स नेमकं कुठे गेलं? या धक्कादायक आणि गूढ प्रश्नाभोवती फिरणारी ‘मिशन’ची कथा प्रेक्षकांना थरार, रहस्य आणि ॲक्शनचा जबरदस्त अनुभव देणार आहे. वास्तव घटनांपासून प्रेरणा घेत काल्पनिक स्वरूपात उभा केलेला हा चित्रपट मराठीतल्या ॲक्शन सिनेमांना नवी दिशा देणारा ठरण्याची चिन्हे आहेत.

‘रेविकांता फिल्म्स निर्मित’ आणि ‘आकात डिस्ट्रिब्युशन’ प्रस्तुत या चित्रपटात अभिनेते अजॉय शर्मा हे पोलिस इन्स्पेक्टरच्या दमदार भूमिकेत झळकणार असून, त्यांच्या अभिनयाची विशेष चर्चा रंगू लागली आहे. चित्रपटातील ॲक्शन सिक्वेन्स, तपास मोहिमेतील तणावपूर्ण प्रसंग आणि प्रभावी संवाद यामुळे चित्रपट अधिक उत्कंठावर्धक बनला आहे.
चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग, विजय पाटकर, शांती बावकर, सुरेखा कुडची, सिद्धेश आचरेकर, संकेत मोरे, ओम राणे, विपुल भोईर, नंदकुमार गोरुले यांच्यासह अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. कलाकारांची भक्कम फळी आणि कथानकाची पकड ही या चित्रपटाची जमेची बाजू मानली जात आहे.
चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सौ. कांता शर्मा यांनी सांभाळली असून, चंद्रकांत विसपुते आणि कैलाश पवार यांनी दिग्दर्शन केले आहे. कथा आणि लेखनाची जबाबदारीही चंद्रकांत विसपुते यांनी समर्थपणे पेलली आहे. संगीत क्षेत्रात समीर खोले, मंदार कीर, रवींद्र खरात आणि विकी वाघ यांनी योगदान दिले असून, गायक सुदेश भोसले, हर्षवर्धन वावरे, कस्तुरी साईराम, विकी वाघ आणि दिशा सुतार यांच्या आवाजाने गाण्यांना विशेष रंगत आली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत आशय, ॲक्शन आणि तपास थरार यांचा संगम घडवणारा ‘मिशन’ हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. १५ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडे आता सिनेरसिकांचे लक्ष लागले आहे.
