कोल्हापुरात राजकीय बर्फ वितळतोय?; जिल्ह्याच्या राजकारणात नवे वारे.

गाव-वाडीपासून जिल्ह्याच्या सत्ताकारणापर्यंत चर्चांना उधाण; गोकुळ, जिल्हा बँक, विधानसभा आणि शक्तीपीठ महामार्ग ठरताहेत केंद्रबिंदू

Kolhapur special news : जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या पंधरा दिवसांपासून पडद्यामागे सुरू असलेल्या हालचालींनी नव्या राजकीय समीकरणांची चाहूल लागली आहे. अनेक वर्षे एकमेकांविरोधात राजकीय आखाड्यात उभे ठाकलेले दोन मातब्बर नेते आता सावधपणे एकमेकांच्या जवळ येत असल्याच्या चर्चांनी जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण केली आहे.

Advertisements

राजकीय घडामोडींच्या या बदलत्या पटावर दोन्ही बाजूंनी अत्यंत संयमाने आणि ‘शबुरी’ची भूमिका घेत पावले टाकली जात असल्याचे चित्र दिसत आहे. उघडपणे कुणीही भाष्य करत नसले, तरी अंतर्गत स्तरावर सकारात्मक संवाद सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

मात्र या संभाव्य जवळीकीमुळे सर्वाधिक संभ्रमात गेले आहेत ते गाव-वाडी-वस्त्यांवर वर्षानुवर्षे एकमेकांविरोधात राजकारण करणारे कार्यकर्ते. विकासकामे, स्थानिक प्रश्न आणि गटबाजी यावरून परस्परांविरोधात भूमिका घेत राजकीय अस्तित्व टिकवणाऱ्या कार्यकर्त्यांची आता मोठी ‘गोची’ झाल्याचे चित्र आहे. “उद्या नेते एकत्र आले तर आपली भूमिका काय?” हा प्रश्न अनेकांना अस्वस्थ करू लागला आहे.

गावपातळीवर सध्या एक वाक्य चर्चेत आहे — *“नेते बदलले तर कार्यकर्त्यांनाही जुळवून घ्यावेच लागते.”* कोल्हापूरच्या विकासासाठी जर दोन मोठे राजकीय प्रवाह एकत्र येत असतील, तर स्थानिक स्तरावरचे कटुतेचे राजकारणही आपोआप मागे पडेल, अशी भावना काही कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.

राजकारणातील बदलत्या नातेसंबंधांवर भाष्य करताना अनेक जाणकार “प्रेम, युद्ध आणि राजकारणात काहीही अशक्य नसते,” असे म्हणताना दिसत आहेत. कारण कालपर्यंत कट्टर विरोधक असलेले नेते आज एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि आजचे समीकरण उद्या पूर्णपणे बदलू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या विषयांभोवती ही चर्चा केंद्रित होताना दिसत आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक, जिल्हा बँकेचे सत्तासमीकरण, आगामी विधानसभा निवडणुका तसेच शक्तीपीठ महामार्ग या मुद्द्यांवरून राजकीय रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे.

एकंदरीत, कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या पडद्यामागे वेगवान हालचाली सुरू असून, येत्या काही दिवसांत अनेकांना धक्का देणारे नवे चित्र समोर येण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. जिल्ह्याच्या सत्ताकारणात कोण कुणासोबत जाणार, कोणाची भूमिका बदलणार आणि कोणते नवे समीकरण आकार घेणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *