बदली हा शेवट नसतो… नव्या जबाबदारीचा, नव्या विश्वासाचा प्रारंभ असतो!
कोल्हापूर | प्रतिनिधी
प्रशासकीय सेवेत बदली हा नित्यक्रम असला, तरी आपल्या कार्यातून सहकाऱ्यांच्या मनात जिव्हाळ्याचे स्थान निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्याचा निरोप मात्र प्रत्येकासाठी भावनिक क्षण ठरतो. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोल्हापूर विभागातील उपसंचालक प्रवीण टाके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बदलीनिमित्त आयोजित निरोप समारंभाने अशाच भावना व्यक्त केल्या. हा केवळ निरोपाचा कार्यक्रम नव्हता, तर कर्तव्यनिष्ठा, संवेदनशीलता आणि प्रभावी प्रशासनाला दिलेला सन्मान होता.
श्री. टाके यांनी आपल्या कार्यकाळात शासनाच्या विविध योजना आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य अत्यंत समर्पित भावनेने केले. पत्रकार, अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी त्यांनी जपलेले आत्मीय संबंध त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य ठरले. त्यामुळे त्यांच्या बदलीची बातमी अनेकांसाठी भावनिक ठरली.
याच बदली प्रक्रियेत जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांची सिंधुदुर्ग येथे बदली झाली असून, सातारा येथील जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांची कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्गचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली आहे.
विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित निरोप समारंभात शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर, माहिती अधिकारी फारूक बागवान, सहायक संचालक वृषाली पाटील,
पत्रकारिता विभाग प्रमुख प्रा.निशा मुढे, विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच माध्यम क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी श्री. टाके आणि श्री. अडसूळ यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
प्रशासनातील बदली म्हणजे केवळ कार्यस्थळ बदलणे नव्हे, तर अनुभव, विश्वास आणि सेवाभाव नव्या भूमीत घेऊन जाण्याची संधी असते. कर्तव्याला सर्वोच्च मानणारे अधिकारी जिथे जातात, तिथे आपल्या कार्याची वेगळी छाप निर्माण करतात. प्रवीण टाके आणि सचिन अडसूळ यांची ही नवी वाटचालही अशाच यशस्वी पर्वाची सुरुवात ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
सोमवारपासून हे सर्व अधिकारी आपल्या नव्या नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणार असून, त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
