हजारो महिलांना स्वावलंबनाची वाट दाखवणाऱ्या भागीरथी संस्थेचे कार्य कौतुकास्पद – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

महिला सक्षमीकरणाला आर्थिक बळाची नवी दिशा; गडहिंग्लजमध्ये भागीरथी मल्टीस्टेटची पहिली शाखा सुरू

गडहिंग्लज, दि. ४ : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वावलंबनाची दिशा देण्यात भागीरथी संस्थेने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आजवर हजारो महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखविणाऱ्या या संस्थेच्या माध्यमातून भविष्यातही महिलांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडेल, असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.

गडहिंग्लज शहरात भागीरथी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पहिल्या शाखेचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी पालकमंत्री आबिटकर बोलत होते.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सौ. अरुंधती महाडिक यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे सांगून आबिटकर म्हणाले, महिलांना आर्थिक पाठबळ मिळाल्यास केवळ कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण समाज अधिक सक्षम होतो. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अशा संस्था प्रेरणादायी ठरत आहेत. सावकारीच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठीही सहकारी पतसंस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. भागीरथी संस्था भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात सामाजिक कार्य करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भागीरथी पतसंस्थेचे मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये रूपांतर झाल्यानंतर गडहिंग्लज येथे सुरू झालेली ही पहिली शाखा महिलांसाठी आर्थिक सेवांचे नवे दालन खुले करणारी ठरणार आहे. संस्थेच्या माध्यमातून महिलांना विविध आर्थिक सेवा, कर्जसुविधा तसेच आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

यावेळी चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी भागीरथी संस्थेच्या स्थापनेमागील उद्दिष्टांची माहिती दिली. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी बनविण्याचे स्वप्न सौ. अरुंधती महाडिक यांनी पाहिले आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांना यश मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

खासदार धनंजय महाडिक यांनी भागीरथी संस्थेच्या वीस वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. सुमारे ४० हजार महिलांना जोडणारे मानाचे व्यासपीठ म्हणून संस्थेने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, एका छोट्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य आणि स्वयंरोजगार अशा विविध क्षेत्रांत महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी संस्थेने उल्लेखनीय काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.

गडहिंग्लजमध्ये भागीरथी संस्थेची शाखा सुरू होणे ही अभिमानाची बाब असून, या शाखेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असेही महाडिक यांनी स्पष्ट केले.

यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नूतन सभासदांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. उपस्थित महिलांनी भागीरथी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, संस्थेच्या माध्यमातून आपले आर्थिक भविष्य अधिक सक्षम होण्यास मदत मिळेल, अशी भावना व्यक्त केली.

कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, वैष्णवी महाडिक, प्रकाशराव चव्हाण, किसनराव कुराडे, रमेश रिंगणे, बिना कुराडे, राजेंद्र तारळे, प्रितम कापसे, वंदना खोत, सारिका बटकडली, नागेश चौगुले, शिवाज मगर यांच्यासह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *