श्रावण व्रतवैकल्यातून हिंदू संस्कृतीचा जागर; पाच हजारांहून अधिक भाविकांचा सहभाग
कोल्हापूर प्रतिनिधी, दि. २४ : पाश्चात्त्य संस्कृतीचा वाढता प्रभाव असताना हिंदू धर्माची समृद्ध संस्कृती, धार्मिक परंपरा आणि संस्कार जपणे ही काळाची गरज आहे. नव्या पिढीला हिंदू संस्कृतीशी जोडण्यासाठी आगामी काळात हिंदू धर्म शिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
समस्त हिंदुत्ववादी संघटना आणि आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने नष्टे लॉन येथे आयोजित श्रावण व्रतवैकल्य’ सामुदायिक उपवास सोडण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात पंचगंगा नदीतून कावडीने आणलेल्या पवित्र जलाने श्री महादेवाच्या पिंडीस व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस जलाभिषेक करून झाली. त्यानंतर गोमाता पूजन, ध्वजवंदन, महायज्ञ आणि आरती करण्यात आली.
१०८ जोडप्यांनी एकाच वेळी सामुदायिक उपवास सोडला, तर सुमारे पाच हजारांहून अधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
एस्कॉन भजनी मंडळाच्या जप-भजनांनी कार्यक्रम भक्तिमय झाला. विविध देवतांच्या प्रतिकृतींचे पूजन तसेच हिंदू धर्म व संस्कृतीविषयक बोधवाक्यांचे फलक लावण्यात आले होते.
१३ वर्षांपूर्वी कोल्हापुरातून सुरू झालेल्या या उपक्रमाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत असून, हिंदू समाजाची एकजूट अधिक मजबूत करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे आहे. ‘श्रावण व्रतवैकल्य’ उपक्रमाचे स्वरूप भविष्यात देशभर विस्तारावे, अशी अपेक्षाही आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हिंदू समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
