मीडिया कंट्रोल विशेष वृत्त : श्रावण महिन्याच्या पावित्र्याला सामाजिक एकतेची आणि हिंदू संस्कृतीच्या जागराची जोड देणारा ‘श्रावण व्रतवैकल्य’ हा उपक्रम यंदाही उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. समस्त हिंदुत्ववादी संघटना आणि आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने गेल्या १३ वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेल्या या उपक्रमाचे आयोजन सोमवार, २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत नष्टे लॉन, महावीर गार्डनजवळ, कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा व भगिनी मंचच्या अध्यक्षा सौ. वैशाली राजेश क्षीरसागर यांनी दिली.
हिंदू धर्मातील सण-परंपरांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे आणि समाजात एकात्मतेची भावना दृढ व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यंदाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
कार्यक्रमाची सुरुवात पंचगंगा नदीतून कावडीने आणलेल्या पवित्र जलाने श्री महादेवाच्या पिंडीस आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस जलाभिषेकाने होणार आहे. त्यानंतर गोमाता पूजन, ध्वजवंदन आणि शस्त्रपूजन होईल. अकरा नवदाम्पत्यांच्या उपस्थितीत महायज्ञ संपन्न झाल्यानंतर हिंदू देवतांचे पूजन, भारतमातेचे पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात येणार आहे.
या धार्मिक सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे विविध जाती-पंथातील १०८ दाम्पत्य एकाच वेळी केळीच्या पानावर सात्त्विक भोजन करून सामुदायिक पद्धतीने आपला उपवास सोडणार आहेत. यावेळी इस्कॉनच्या भजन-कीर्तनातून आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार आहे.
‘श्रावण व्रतवैकल्य’च्या माध्यमातून हिंदू संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा संदेश पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील नागरिक, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तालीम संस्था, मंडळांचे कार्यकर्ते तसेच सकल हिंदू समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
बैठकीस ज्येष्ठ हिंदुत्ववादी कार्यकर्ते बाबा वाघापूरकर, यादव महाराज, श्रीकांत पोतनीस, उदय भोसले, किशोर घाटगे, चंद्रकांत बराले, मधुकर नाझरे, निरंजन शिंदे, सुनील सामंत, कमलाकर किलकिले, विक्रम जरग, जी. जी. जोशी, विकास यादव, किरण दुसे, अर्जुन आंबी, पूजा भोर यांच्यासह सकल हिंदू समाज व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
