कोल्हापुरात रविवारी जीप 4X4 ऑफ रोडिंगचा थरार

आजरीज इको व्हॅलीत रंगणार एकदिवसीय स्पर्धा; महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक तिन राज्यातील स्पर्धकांचा सहभाग

कोल्हापूर, ता. १ : साहस, पर्यटन आणि निसर्गाचा अनोखा संगम साधणाऱ्या 4X4 कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने रविवारी (ता. ४) गगनबावडा-वेसरफ येथील आजरीज इको व्हॅली येथे जीप (4X4) ऑफ रोडिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकातील विविध भागांतील स्पर्धक सहभागी होणार असून, कोल्हापूरच्या सह्याद्री परिसरात ऑफ रोडिंगचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

याबाबतची माहिती डॉ. नचिकेत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पश्चिम घाटाचा महत्त्वाचा भाग असलेल्या गगनबावडा-वेसरफ परिसरात निसर्गाशी एकरूप होत आणि पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचविता आजरीज इको व्हॅलीची उभारणी करण्यात आली आहे. या पर्यटन केंद्राला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धांचा अनुभव असलेले ऑफ रोडर अश्विन शिंदे यांच्या नियोजनातून ही स्पर्धा पार पडणार आहे. एकदिवसीय 4X4 ऑफ रोडिंग फॅमिली इव्हेंटमध्ये सुमारे २०० जण सहभागी होणार असून, ग्रुप ड्राईव्ह, ट्रायल ड्राईव्ह आणि फॅमिली ड्राईव्हनंतर प्रमुख टाईम ट्रायल स्पर्धा घेण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, पुणे, मुंबई, नाशिक तसेच गोवा आणि कर्नाटक येथून स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजीराव मोहिते तसेच ‘रोड टू लंडन’ ही सेल्फ ड्राईव्ह मोहीम पूर्ण केलेले हेमंत शहा उपस्थित राहणार आहेत. याशिवाय अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले अनेक ऑफ रोडरही या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

पर्यटनाला चालना देणे, स्थानिकांना प्रोत्साहन देणे तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात संरक्षण व मदतीसाठी आवश्यक कौशल्यांना प्रोत्साहन देणे, या दुहेरी उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या आव्हानात्मक मार्गांवरून वाहन चालविण्याच्या कौशल्याची कसोटी या स्पर्धेत लागणार आहे. विजेत्या स्पर्धकांना मेडल, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

दरम्यान, स्पर्धेच्या टी-शर्टचे अनावरण करण्यात आले. यावेळी चितेश मुंडोडी, डॉ. नचिकेत पाटील, ऑफ रोडर अश्विन शिंदे, कुणाल धुम्मा, दिग्विजय लोगळे, राकेश जाधव, बाईक रायडर प्रशांत काशीद, रूपेश भोसले, संदीप पाटील, अभिजित बोगार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *