प्रवाशांच्या सुविधेसाठी नूतनीकरण; रेल्वे, बस, विमान तिकीटांसह हॉटेल बुकिंग व मनी एक्स्चेंजची सुविधा
कोल्हापूर, ता. ३ :शाहूपुरी व्यापारी पेठेतील वि. स. खांडेकर प्रशालेजवळील सेंट्रल ऑथराइज्ड रेल्वे रिझर्वेशन सेंटर (यात्री तिकीट सुविधा केंद्र)च्या स्थलांतरित व नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक पद्धतीने विकसित करण्यात आलेल्या या केंद्रात रेल्वे आरक्षणासह विविध प्रवासी व पर्यटन सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
हे केंद्र कुशल टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून कार्यरत असून, संचालक उमेश शहा यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ प्रवाशांना विविध सेवा दिल्या जात आहेत. व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी उमेश शहा यांचे सुपुत्र कौस्तुभ शहा, बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) पदवीधर असून, नव्या संकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपक्रमात सक्रिय योगदान देत आहेत.
या केंद्रामध्ये रेल्वेच्या विविध श्रेणींचे आरक्षण, ई-रेल्वे तिकीट, लक्झरी बस, रेडबस तसेच विमान तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर हॉटेल बुकिंग आणि मनी एक्स्चेंजची सुविधाही प्रवाशांना मिळणार आहे. आयआरसीटीसी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांसाठी टूर पॅकेज आणि प्रवासाचे नियोजन करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शालेय व शैक्षणिक सहली, समूह सहली, कुटुंबीयांच्या सहली तसेच वैयक्तिक प्रवासासाठी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय टूर बुकिंगची सुविधा या केंद्रातून उपलब्ध होणार आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सुखकर आणि नियोजनबद्ध व्हावा, यासाठी केवळ आरक्षण न करता आवश्यक मार्गदर्शन करण्यावरही भर देण्यात येत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक व गरजू प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
परिसरातील प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट घरपोहोच देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मोबाईलवरून बुकिंग स्वीकारले जाणार असल्याने प्रवाशांना आरक्षणासाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा अधिक सुलभ करण्यासाठी कौस्तुभ शहा पुढाकार घेत आहेत.
दरम्यान, रेल्वे प्रवासी समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी कोल्हापूरच्या आगामी वीस वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन वाहतूक व पर्यटनाच्या दृष्टीने नियोजन करण्याची आवश्यकता व्यक्त केली. स्थानिक पातळीवर वाहतूक, निवास आणि आदरातिथ्याच्या सुविधा विकसित झाल्यास कोल्हापूरच्या पर्यटनाला आणखी चालना मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.
प्रवाशांचे आरक्षण करून देण्याबरोबरच त्यांचा वेळ व पैसा वाचविणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. या दृष्टीने शहा परिवाराने सुरू केलेला उपक्रम उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करून आमदार अमल महाडिक यांनी केंद्राला शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्टेशन मास्टर विजय पोद्दार, मुंबई विभागीय रेल्वे प्रवासी समितीचे सदस्य बाबासाहेब निंबाळकर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेट्टी, सुजय शेटे, क्रिडाईचे सुजय होसमाने, बीडीओ मिलिंद टोणपे-कोठारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन रेल्वे आरक्षणासोबतच विविध प्रवासी व पर्यटन सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे कुशल टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक उमेश शहा यांनी सांगितले.


