दुष्काळी संकटाच्या पार्श्वभूमीवर आदिशक्तीच्या झिम्मा-फुगडी स्पर्धेला विराम
उत्सवापेक्षा संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे महत्त्वाचे : अध्यक्षा वेदांतिका माने

उत्सवापेक्षा संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे महत्त्वाचे : अध्यक्षा वेदांतिका माने

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी  : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची गंभीरता आणि खरीप हंगामावर झालेला प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन, आदिशक्ती महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सोमवार, दि. ५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या झिम्मा-फुगडी स्पर्धा यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक संवेदनशीलतेचे भान जपत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा वेदांतिका धैर्यशील माने यांनी दिली.

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने तसेच पावसात पडलेल्या दीर्घ खंडामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांत पिके करपून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत आनंदोत्सव आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे माने यांनी स्पष्ट केले.

“झिम्मा-फुगडी हा महिलांच्या आनंदाचा आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचा उत्सव आहे. महिलांच्या कला-कौशल्याला व्यासपीठ देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र, आज बळीराजा संकटात असताना त्याच्या दुःखाकडे दुर्लक्ष करून उत्सव साजरा करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे यंदाची स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे वेदांतिका माने यांनी सांगितले.

आदिशक्ती महिला बहुउद्देशीय संस्था सामाजिक बांधिलकी जपत महिलांच्या कला, संस्कृती आणि कर्तृत्वाला सातत्याने प्रोत्साहन देत आहे. मात्र, सध्याच्या संकटाच्या काळात शेतकरी कुटुंबांच्या भावनांचा विचार करून उत्सवापेक्षा सामाजिक जबाबदारीला प्राधान्य देण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून शेतकरी बांधवांची लवकरात लवकर सुटका व्हावी, शेतीला नवसंजीवनी मिळावी आणि राज्यात समाधानकारक पाऊस पडून परिस्थिती पूर्वपदावर यावी, अशी सदिच्छाही माने यांनी व्यक्त केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *