दोन फुटांचा गणराया… अन् २० फुटांची श्रद्धा!

‘गुन्हेगारांची वसाहत’ अशी लागलेली ओळख पुसत लक्षतीर्थच्या गणरायाने घडवला परिवर्तनाचा प्रवास…

कोल्हापूर प्रतिनिधी : परिस्थिती प्रतिकूल होती… हातात पैसा नव्हता… भविष्यासाठी ठोस आधार नव्हता. आजूबाजूला सामाजिक अस्वस्थता होती आणि जगण्याच्या संघर्षात अनेक तरुण भरकटत होते. अशा काळात एका कुटुंबाने मात्र परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी मोठी साधनं नव्हे, तर श्रद्धेचा आधार घेतला.

अवघ्या दोन फुटांच्या गणेशमूर्तीपासून सुरू झालेली ही श्रद्धा आज २० फुटांच्या भव्य गणरायापर्यंत पोहोचली आहे. गेल्या दोन दशकांत या गणरायाच्या चरणी केवळ फुलं आणि हार अर्पण झाले नाहीत, तर अनेकांनी आपली दुःखं, नवस आणि आयुष्य बदलण्याची आशा अर्पण केली. म्हणूनच लक्षतीर्थ वसाहतीतील हा गणराया आता अनेकांसाठी ‘नवसाचा श्री गणेशा’ बनला आहे.

गणरायाच्या दर्शनासाठी सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांची पावलं या वसाहतीकडे वळतात. नाट्य, मालिका, चित्रपट, राजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरही या गणरायाच्या चरणी नतमस्तक होतात. जिथे कधीकाळी लोक येण्यासही कचरायचे, त्याच परिसरात आज दर्शनासाठी गर्दी होते; हा बदल केवळ गणेशमूर्तीच्या उंचीचा नाही, तर एका वसाहतीच्या बदललेल्या मानसिकतेचा आहे.

तोफेच्या माळावर उभी राहिलेली वस्ती…

कोल्हापूरच्या पश्चिमेला पूर्वीचा तोफेचा माळ अशी ओळख असलेल्या वसाहतीचा. काळ बदलला, शहर विस्तारले आणि या माळावर झोपड्या उभ्या राहू लागल्या. हळूहळू या परिसराची ओळख लक्षतीर्थ वसाहत अशी झाली.

मात्र झोपडपट्टीच्या समस्यांसोबतच गरिबी, शिक्षणाचा अभाव आणि अस्थिर सामाजिक वातावरणाने या वसाहतीसमोर अनेक प्रश्न उभे केले. जगण्यासाठीची धडपड काहींना चुकीच्या मार्गावर घेऊन गेली. मारामाऱ्या, चोऱ्या आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे या परिसराची ओळखच बदलली.

‘गुन्हेगारांची वसाहत’ असा शिक्का या भागावर बसला.

पण प्रत्येक वस्तीची ओळख तिच्या भूतकाळाने ठरत नाही. तिच्यातील माणसांच्या प्रयत्नांनी ती बदलू शकते, याची साक्ष पुढील दोन दशकांनी दिली.

 

दोन भावांनी पेटवली श्रद्धेची ज्योत

याच लक्षतीर्थ वसाहतीत अविनाश आणि मनोज गवळी यांचे कुटुंब राहत होते. परिस्थितीशी झुंज देत दोघेही कष्ट करत होते. हातावर पोट असलेल्या या कुटुंबाकडे मोठ्या उत्सवासाठी पैसा नव्हता; पण गणरायावरची श्रद्धा मोठी होती.

सुमारे २० वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या घरात अवघ्या दोन फुटांच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली.

कदाचित त्या वेळी कुणालाही कल्पना नसेल की, घराच्या एका कोपऱ्यात श्रद्धेने बसवलेला हा दोन फुटांचा गणराया पुढे हजारो भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू बनेल.

दरवर्षी गणेशमूर्तीची उंची वाढत गेली. पण त्यापेक्षा वेगाने वाढत गेली ती भक्तांची आस्था.

मूर्ती उंचावत गेली… आणि आयुष्यांचीही दिशा बदलत गेली!

अविनाश गवळी, बांधकाम व्यावसायिक आहेत तर, मनोज गवळी व्यवसायानिमित्त गोव्याला गेले. तेथे सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र लक्षतीर्थशी आणि गणरायाशी असलेली नाळ कायम राहिली.

दरम्यान, या गणरायाच्या दर्शनाने अनेकांच्या मनाला आधार मिळाला. नवस पूर्ण झाल्याच्या, संकटातून मार्ग सापडल्याच्या आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडल्याच्या भावना भक्त व्यक्त करू लागले.

श्रद्धा वाढली… भक्त वाढले… आणि गणरायाचा उत्सवही विस्तारत गेला.

दोन फुटांपासून सुरू झालेला हा प्रवास आता तब्बल २० फुटांच्या भव्य गणेशमूर्तीपर्यंत येऊन पोहोचला आहे.

सेलिब्रिटींची पावलंही वळली लक्षतीर्थकडे!

‘नवसाला पावणारा गणपती’ अशी या गणरायाची ख्याती वाढत गेली आणि लक्षतीर्थ वसाहतीकडे येणाऱ्या मान्यवरांची संख्याही वाढली.

नाट्य, मालिका, चित्रपट, राजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी या गणरायाच्या दर्शनासाठी आवर्जून येऊ लागले. सुवर्णालंकारांनी सजलेल्या गणरायाचे दर्शन घेताना त्यांच्या चेहऱ्यावरची भक्तिभावाची भावना अनेकांना अनुभवता आली.

ढोल-ताशांचा गजर… आणि लक्षतीर्थचा गणराया निघाला!

त्यानंतर ढोल-ताशांचा कडकडाट, विद्युत रोषणाई आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली.

गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आणि सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी अवघी लक्षतीर्थ वसाहत रस्त्यावर उतरली.

गणरायाच्या उंचीपेक्षा मोठी झाली माणुसकीची उंची!

आज लक्षतीर्थ वसाहतीत गणेशोत्सव साजरा होताना केवळ एका गणेशमूर्तीचे आगमन होत नाही; तर एका वसाहतीच्या बदललेल्या ओळखीचा उत्सव साजरा होतो.

कधीकाळी गुन्हेगारीच्या चर्चेने ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात आज गणरायाच्या भक्तीचा जयघोष ऐकू येतो. तरुण पिढी गैरमार्गापासून दूर जाऊन भक्ती, सामाजिक बांधिलकी आणि सकारात्मक विचारांकडे वळत असल्याची भावना नागरिक व्यक्त करतात.

दोन फुटांच्या गणरायाने सुरू केलेला प्रवास आज २० फुटांवर पोहोचला आहे. पण खरी उंची गणेशमूर्तीची नाही… खरी उंची आहे त्या श्रद्धेची,
खरी उंची आहे त्या संघर्षाची, आणि खरी उंची आहे—परिस्थिती बदलण्याची जिद्द ठेवणाऱ्या माणसांची जिथे कधीकाळी परिस्थितीने माणसांना हरवलं होतं, तिथे आज श्रद्धेने माणसांना उभं केलं आहे. आणि म्हणूनच लक्षतीर्थचा हा गणराया केवळ ‘नवसाचा श्री गणेशा’ राहिलेला नाही… तो एका वसाहतीच्या बदलाची, संघर्षातून उभं राहण्याची आणि श्रद्धेतून सकारात्मक परिवर्तन घडवण्याची प्रेरणादायी कहाणी बनला आहे.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी शनिवारी गणरायाच्या आगमनाची मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. ‘देवमाणूस’ मालिकेतील अभिनेत्री वैशाली कल्याणकर, अभिनेते किरण गायकवाड, सातारा महापालिकेचे नगरसेवक पंकज चव्हाण, उद्योजक मनोज गवळी आणि अविनाश गवळी यांच्या हस्ते गणरायाचे पूजन करण्यात आले. वर लक्ष तीर्थ वसाहती ल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *