“दोन लाख राख्यांतून उमटला जवानांप्रती करवीरचा प्रेमबंध; ताराराणींच्या नावाने घडणार नव्या रणरागिणींची शौर्यगाथा!” 🇮🇳

स्वामी विवेकानंद ट्रस्टचा २७ वर्षांचा ‘एक राखी सीमेवरील जवानांसाठी’ उपक्रम; छत्रपती ताराराणी यांच्या नावाने सैनिकी स्कूल सुरू करण्यासाठी महापौर रूपाराणी निकम यांचा पुढाकार

कोल्हापूर प्रतिनिधी : देशाच्या सीमेवर ऊन-पाऊस, थंडी-वारा आणि जीवाची पर्वा न करता मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या मनगटावर रक्षाबंधनाच्या निमित्ताने करवीरच्या भगिनींनी पुन्हा एकदा प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञतेची राखी बांधली. स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या ‘एक राखी सीमेवरील जवानांसाठी’ या उपक्रमातून यंदा तब्बल दोन लाखांहून अधिक राख्या संकलित करण्यात आल्या.या राख्यांचा प्रदान सोहळा महादेव मंदिर, मराठा बटालियन टी.ए.च्या प्रांगणात भावपूर्ण वातावरणात पार पडला.

कारगिल युद्धाच्या काळापासून सलग २७ वर्षे सुरू असलेला हा उपक्रम केवळ राखी बांधण्याचा कार्यक्रम नसून, सीमेवर तैनात असलेल्या जवानांप्रती कोल्हापूरकरांच्या मनात असलेल्या निःस्वार्थ प्रेमाची आणि राष्ट्रभक्तीची जिवंत परंपरा बनला आहे. यंदा दोन लाखांहून अधिक राख्यांचे संकलन झाले, हीच या उपक्रमाला मिळालेल्या जनसहभागाची आणि विश्वासाची मोठी पोचपावती असल्याचे मत ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूल, छत्रपती शाहू हायस्कूल, चाटे स्कूल आणि तक्षशिला इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले. विविध शाळांतील विद्यार्थीनी तसेच महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनी जवानांना राख्या बांधून आपल्या भावना व्यक्त केल्या. शहीद महाविद्यालय तिटवे, नुमवि, आदर्श प्रशाला सरनाईक कॉलनी, कन्या विद्यालय कळंबा आणि न्यू मॉडेल स्कूलच्या विद्यार्थीनींनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

‘करवीरच्या लेकी लष्करी क्षेत्रातही पुढे याव्यात’

गेल्या दहा वर्षांपासून ट्रस्टच्या वतीने **छत्रपती ताराराणी यांच्या नावाने सैनिकी स्कूल तसेच मुलींसाठी लष्करी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना महापौर रूपाराणी निकम यांनी, छत्रपती ताराराणी यांचे शताब्दी वर्ष सुरू असताना आणि आपल्या महापौरपदाच्या कार्यकाळात ही मागणी पूर्णत्वास नेण्यासाठी जातीने प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात आपली कर्तृत्वाची छाप उमटविली असून, देशरक्षणाच्या क्षेत्रातही त्या कुठेही मागे नाहीत, हे ‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने देशाने अनुभवले आहे.करवीरच्या मुलींनीही संरक्षण क्षेत्रात धाडसी पाऊल टाकून नावलौकिक मिळवावा, अशी अपेक्षा महापौर निकम यांनी व्यक्त केली.

‘या राख्यांतून जवानांना मिळते बारा हत्तींचे बळ’

ऑनररी लेफ्टनंट कर्नल संतोष सकुंडे यांनी करवीरच्या भगिनींनी पाठविलेल्या राख्यांमुळे सीमेवर देशाचे रक्षण करताना जवानांना ‘बारा हत्तींचे नैतिक बळ’ मिळते, अशी भावना व्यक्त केली. कोल्हापूरला समृद्ध लष्करी परंपरा असून, या परंपरेत आता महिलाही आपला ठसा उमटवत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी निवृत्त कर्नल विजयसिंह गायकवाड, ऑनररी लेफ्टनंट शामराव साळवी, ऑनररी लेफ्टनंट राजेश सावंत, एन. एन. पाटील सांगावडेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. नगरसेविका तथा प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती शीला सोनुले, माजी महापौर तथा नगरसेविका माधवी गवंडी, दीपा काटकर, माधुरी किरण नकाते, रेखा उगवे, अर्चना पागर, वंदना मोहिते, निलीमा घाटगे यांच्यासह शालेय विद्यार्थिनी व महिलांनी उपस्थित जवानांना भावपूर्ण वातावरणात राख्या बांधल्या.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाटगे, सचिव राजेंद्र मकोटे यांच्यासह कमलाकर किलकीले, महेश कामत, डॉ. सायली कचरे, सौ. यशश्री घाटगे, अशोक लोहार, सीमा मकोटे, प्रशांत बरगे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, कागल, गारगोटी, राधानगरी, पन्हाळा आणि गगनबावडा येथील विविध शाळा तसेच महिला बचत गटांनी राख्या पाठवून या राष्ट्रभावनेच्या उपक्रमात सहभाग नोंदविला. त्यामुळे या राख्या केवळ धागे राहिल्या नाहीत, तर सीमेवर उभ्या असलेल्या जवानांच्या मनगटावर कोल्हापूरच्या मातीतील माया, भगिनींचे प्रेम आणि अखंड भारताची कृतज्ञता बांधणारा भावबंध ठरल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *