९,४०० प्रशिक्षणार्थींमधून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ३० जणांमध्ये निवड; गुरुग्राममध्ये सॅमसंग इंडियाकडून विशेष सत्कार
सांगली | प्रतिनिधी : परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, जिद्द, मेहनत आणि योग्य संधीची साथ मिळाली तर सामान्य कुटुंबातील तरुणही असामान्य यशाची उंची गाठू शकतो, हे सांगलीतील सोहेल समीर सौदागर याने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. सॅमसंग दोस्त सेल्स कार्यक्रमातील देशभरातील तब्बल ९,४०० हून अधिक प्रशिक्षणार्थींमधून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ३० जणांमध्ये सोहेलची निवड झाली असून, गुरुग्राम येथील सॅमसंग इंडियाच्या प्रादेशिक मुख्यालयात त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कौटुंबिक परिस्थितीमुळे सोहेलने वडिलांसोबत गॅरेजमध्ये काम करण्यास सुरुवात केली. परिस्थितीशी दोन हात करताना त्याच्या मनात मात्र पुढे जाण्याची धडपड कायम होती. याच धडपडीला सॅमसंग दोस्त कार्यक्रमाने कौशल्याची आणि आत्मविश्वासाची दिशा दिली.
सॅमसंग दोस्तमध्ये सहभागी झाल्यानंतर सोहेलने ग्राहकांशी प्रभावी संवाद साधणे, त्यांच्या गरजा समजून घेणे, उत्पादनांची अचूक माहिती देणे तसेच रिटेल क्षेत्रातील व्यावहारिक कामकाजाची कौशल्ये आत्मसात केली. गॅरेजमधील कामापासून रिटेल शॉपच्या फ्लोअरपर्यंतचा त्याचा प्रवास हा केवळ व्यवसाय बदलण्याचा प्रवास नसून स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवत आयुष्य बदलण्याचा प्रवास ठरला.
महाराष्ट्रातील सॅमसंग दोस्त कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण व प्रमाणपत्र मिळालेल्या २,५७९ तरुणांमध्ये सोहेलचा समावेश आहे. देशभरात या उपक्रमातून आतापर्यंत १९ हजारांहून अधिक तरुणांना सक्षम करण्यात आले आहे. उद्योगाच्या गरजांनुसार प्रशिक्षण देऊन तरुणांची रोजगारक्षमता वाढविण्याबरोबरच भारत सरकारच्या स्किल इंडिया मिशनलाही या उपक्रमातून पाठबळ मिळत आहे.
आपल्या यशाबद्दल बोलताना सोहेल सौदागर म्हणाला, “मी एका छोट्या कुटुंबातून आलो आहे. कौटुंबिक परिस्थितीमुळे पदवी पूर्ण केल्यानंतरही वडिलांसोबत गॅरेजमध्ये काम करत होतो. दोस्तमध्ये सहभागी झाल्यानंतर सुरुवातीला अनेक गोष्टी कठीण वाटल्या. मात्र, हळूहळू ग्राहकांशी संवाद साधणे, त्यांच्या गरजा समजून घेणे आणि उत्पादनांची माहिती प्रभावीपणे देणे शिकलो. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत गेला आणि माझ्या आयुष्यात मोठा बदल झाला. मी दोस्तमध्ये सहभागी झालो नसतो, तर कदाचित आजही त्याच ठिकाणी असतो. या सन्मानामुळे मला आनंद आणि अभिमान वाटतो.”
कौशल्याला संधी मिळाली अन् आत्मविश्वासाला पंख फुटले!
सोहेलची कहाणी सांगलीतीलच नव्हे तर राज्यातील हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. परिस्थिती ही माणसाच्या प्रगतीची मर्यादा नसते; कौशल्य, सातत्य आणि संधीचा योग्य उपयोग करण्याची तयारी असेल तर परिस्थितीही बदलता येते, हे सोहेलने दाखवून दिले आहे.
इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्किल्स कौन्सिल ऑफ इंडिया (ESSCI) आणि टेलिकॉम सेक्टर स्किल काउंसिल (TSSC) यांच्या भागीदारीतून प्रशिक्षणार्थींना उद्योगमान्य आणि NSQF-अनुरूप प्रमाणपत्र देण्यात येते. या प्रशिक्षणामुळे तरुणांना केवळ रोजगाराची संधी मिळत नाही, तर उद्योगाच्या बदलत्या गरजांनुसार स्वतःला घडविण्याची संधीही मिळते.
गॅरेजमध्ये वडिलांसोबत काम करणाऱ्या एका तरुणापासून देशातील सर्वोत्तम ३० प्रशिक्षणार्थींमध्ये स्थान मिळविण्यापर्यंतचा सोहेलचा प्रवास एकच संदेश देतो—‘संधी छोटी असो वा मोठी, तिचे सोने करण्याची जिद्द मोठी असली पाहिजे.’
सोहेलचे हे यश सांगलीच्या तरुणाईसाठी आत्मविश्वास जागवणारे आहे. परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा कौशल्य आत्मसात करा, संधी शोधा आणि मिळालेल्या संधीचे कर्तृत्वात रूपांतर करा, हा त्याच्या यशाचा खरा संदेश आहे.
