वीजचोरी तपासणीस गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण

रुकडीतील चौघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा

कोल्हापूर/ दि. ६ : स्मार्ट मीटर बसविणे आणि वीजचोरी तपासणीच्या कामासाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद घालून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना रुकडी (ता. हातकणंगले) येथील वर्धमाननगर परिसरात रविवारी सकाळी घडली. या प्रकरणी महावितरणचे कनिष्ठ अभियंता अशरफ अब्दुल मुल्ला यांच्या तक्रारीवरून किशोर दगडू चव्हाण, विशाल वसंत गोसावी, विनायक भिमराव चव्हाण आणि विमल भिमराव चव्हाण यांच्याविरुद्ध हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धमाननगर येथील वीज ग्राहक भीमराव बाबुराव चव्हाण यांच्या घरी नवीन स्मार्ट मीटर बसविणे तसेच वीजचोरीच्या अनुषंगाने तपासणी करण्याचे काम ६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरू होते. यावेळी संबंधित व्यक्तींनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

वाद वाढल्यानंतर संबंधितांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी हा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी धक्काबुक्की करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे महावितरणच्या शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर कनिष्ठ अभियंता अशरफ अब्दुल मुल्ला यांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहितेतील कलम ३(५), १३२, १२१(१) आणि ३५२ अन्वये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

स्मार्ट मीटर बसविताना ग्राहकांच्या परवानगीची आवश्यकता नाही – गणपत लटपटे

दरम्यान, महावितरणचे कर्मचारी स्मार्ट मीटर बसविणे अथवा वीजचोरीच्या अनुषंगाने तपासणी करण्यासाठी वीज ग्राहकांच्या घरी जातात. अशा अधिकृत कामासाठी ग्राहकांच्या स्वतंत्र परवानगीची कायद्यानुसार आवश्यकता नसल्याचे कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी स्पष्ट केले.

स्मार्ट मीटर हे वीज ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने उपयुक्त असून, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी अधिकृत कर्तव्य बजावताना ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *