पत्रकारांसाठी विधानभवनात विशेष आरोग्य शिबिर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आस्थेने विचारपूस

पत्रकारांसाठी विधानभवनात विशेष आरोग्य शिबिर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आस्थेने विचारपूस

८९२ पत्रकार व नागरिकांची तपासणी

विशेष वृत्त : शरद माळी, मंत्रालय प्रतिनिधी कोल्हापूर युवा पत्रकार संघ, कोल्हापूर

मुंबई, दि. ४ : दिवस-रात्र समाजाच्या प्रश्नांसाठी धावणारी लेखणी अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करते… घटना घडली की सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारा पत्रकार, रात्री-अपरात्री बातमीसाठी जागणारा पत्रकार आणि समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज शासनाच्या दरबारापर्यंत पोहोचविणारा पत्रकार; मात्र या धावपळीत त्याच्या स्वतःच्या आरोग्याची तपासणी कधी होते, हा प्रश्न अनेकदा अनुत्तरितच राहतो. याच संवेदनशील वास्तवाची दखल घेत पत्रकारांच्या आरोग्याला प्राधान्य देणारे विशेष आरोग्य तपासणी व उपचार शिबिर विधानभवन येथे आयोजित करण्यात आले.

मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या समन्वयाने आयोजित या शिबिराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत पत्रकारांच्या आरोग्याची आस्थेने विचारपूस केली. पत्रकारांचे काम हे निश्चित वेळेच्या चौकटीत नसते. तासनतास रस्त्यावर, घटनास्थळी, कार्यालयात किंवा रात्री-अपरात्री काम करताना त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा आरोग्य तपासणी शिबिरातून आजाराची प्राथमिक लक्षणे वेळीच समोर येऊन त्यावर तातडीने उपचार करणे शक्य होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, आमदार योगेश सागर, आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, मंत्रालय प्रतिनिधी आणि पत्रकार उपस्थित होते.

‘समाजाच्या हितासाठी पत्रकाराचे काम २४ तासांचे; मग आरोग्याची जबाबदारीही समाजाचीच!

पत्रकारांचे काम हे केवळ बातमी लिहिण्यापुरते मर्यादित नसून, समाजाच्या सुख-दुःखाचा साक्षीदार होण्याचे काम आहे. अपघात असो, नैसर्गिक आपत्ती असो, राजकीय घडामोडी असोत अथवा सामान्य नागरिकाच्या प्रश्नांचा आवाज असो—पत्रकार प्रत्येक ठिकाणी धावत असतो. मात्र अनियमित कामाचे वेळापत्रक, अपुरी विश्रांती आणि नियमित आरोग्य तपासणीचा अभाव यामुळे अनेकदा आजाराचे निदान उशिरा होते.

ही परिस्थिती बदलण्यासाठी आरोग्य तपासणी शिबिरांसारखे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. प्राथमिक अवस्थेत आजाराची लक्षणे ओळखली गेल्यास पुढील गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

वैचारिक मतभेद बाजूला ठेवून पत्रकार संघटनांचा एकत्रित पुढाकार

पत्रकारांच्या प्रश्नांवर विविध संघटना आपापल्या पद्धतीने काम करतात. मात्र पत्रकारांच्या आरोग्यासारख्या जिव्हाळ्याच्या विषयासाठी वैचारिक मतभेद बाजूला ठेवून विविध पत्रकार संघटनांनी एकत्र येत हा उपक्रम राबविल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व संघटनांचे अभिनंदन केले.

पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आजारपणाच्या काळात आवश्यक मदत व समन्वय मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. उपचार, शस्त्रक्रिया अथवा आवश्यक वैद्यकीय समन्वयासाठी हा अधिकारी पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करणार आहे.

हा उपक्रम केवळ मुंबईपुरता किंवा एका दिवसापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये वर्षभर पत्रकारांना आरोग्यविषयक आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

एकाच छताखाली तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्वसमावेशक तपासणी

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरात विविध वैद्यकीय क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी पत्रकारांची तपासणी करून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

न्यूरोलॉजिस्ट तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गीते, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार, पुणे बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, पोटविकार तज्ज्ञ डॉ. अमित मायदेव, लठ्ठपणा निवारण तज्ज्ञ डॉ. जयश्री तोडकर, यकृत प्रत्यारोपण व पोटविकार तज्ज्ञ डॉ. विभा वर्मा, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. कल्याण मुंडे, जनरल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. मधुकर गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली.

प्राथमिक तपासणी, नेत्ररोग, त्वचारोग, हृदयरोग, स्त्रीरोग, फिजिओथेरपी, जनरल मेडिसिन, अस्थिरोग, कर्करोग, रक्त तपासणी, श्वसनविकार, पोट व पचनसंस्थेचे विकार, कान-नाक-घसा, मानसिक आरोग्य, वजन नियंत्रण, आयव्हीएफ व वंध्यत्व उपचार, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी, दंतचिकित्सा आदी विविध विभागांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच औषध वितरणाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

सकाळपासून सायंकाळपर्यंत ८९२ जणांची आरोग्य तपासणी

सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत सुरू असलेल्या या शिबिरात सुमारे ८९२ पत्रकार आणि इतर नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार व वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले.

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनीही शिबिरातील विविध विभागांना भेट देऊन डॉक्टर, वैद्यकीय पथक आणि पत्रकारांशी संवाद साधला.

पत्रकारांसाठीचा हा उपक्रम म्हणजे केवळ तपासणी नव्हे, तर कर्तव्याच्या धावपळीत स्वतःकडे पाहण्याची आठवण

पत्रकार समाजाला आरसा दाखवतो. सत्तेला प्रश्न विचारतो, अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो आणि सामान्य माणसाच्या वेदनांना शब्द देतो. मात्र हा आरसा स्वच्छ ठेवणाऱ्या पत्रकाराचे आरोग्य दुर्लक्षित राहू नये, हीच या उपक्रमाची खरी भावना आहे.

पत्रकारांनी इतरांच्या प्रश्नांसाठी झगडताना स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, हा संदेश या शिबिरातून अधोरेखित झाला. त्यामुळे हा उपक्रम केवळ एका दिवसाचे आरोग्य शिबिर न ठरता पत्रकारांच्या आरोग्य हक्काकडे गांभीर्याने पाहण्याची सुरुवात ठरावी अशी अपेक्षा पत्रकारांकडून व्यक्त करण्यात आली.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब, टेलिव्हिजन जर्नालिस्ट असोसिएशन (टीव्हीजेए), मुंबई हिंदी पत्रकार संघ, मुंबई क्राईम रिपोर्टर्स असोसिएशन, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, बॉम्बे न्यूज फोटोग्राफर्स असोसिएशन, बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ, व्हॉइस ऑफ मीडिया आणि पत्रकार विकास संघ आदी संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *