लिंगायत समाजासाठी ‘अमृत’च्या योजनांचे दरवाजे खुले; राज्य अध्यक्ष संजय तेलनाडे 

 हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजाचा ‘अमृत’च्या लक्षित गटात समावेश; शिक्षण, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास आणि स्वयंरोजगारासाठी योजनांचा लाभ मिळणार

कोल्हापूर, हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे या संस्थेच्या लक्षित गटामध्ये हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजाचा समावेश करण्याचा शासन आदेश इतर मागास बहुजन कल्याण विभागाने जारी केला आहे. या निर्णयामुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, प्रशिक्षण तसेच स्वयंरोजगाराच्या संधींची नवी दारे खुली झाली आहेत.

या निर्णयाची माहिती समस्त लिंगायत समाजाचे राज्याध्यक्ष संजय तेलनाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शासनाच्या या निर्णयामुळे पात्र लाभार्थ्यांना ‘अमृत’ संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार असून, विशेषतः आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय तेलनाडे म्हणाले, हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजातील जे नागरिक किंवा विद्यार्थी इतर मागासवर्गीय (ओबीसी) अथवा अन्य कोणत्याही आरक्षित प्रवर्गाचा किंवा स्वतंत्र महामंडळाच्या योजनांचा लाभ घेत नाहीत, त्यांना ‘अमृत’च्या योजनांचा लाभ घेता येईल. त्यासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आणि शासनाने निश्चित केलेले आर्थिक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. या समाजघटकातील विद्यार्थ्यांचा ‘अमृत’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण योजनांमध्ये समावेश करण्याचे निर्देशही संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आले आहेत.

 शिक्षणासाठी भक्कम आर्थिक आधार

‘अमृत’च्या योजनांमुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक हातभार लागणार आहे. आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएस, आयआयआयटी यांसारख्या देशातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत दरमहा १० हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

याशिवाय यूपीएससी मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या तयारीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत, तर एमपीएससी तसेच गट ‘अ’ आणि ‘ब’ परीक्षांसाठी १५ हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे. टायपिंग व लघुलेखन प्रशिक्षणासाठीही आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे. ड्रोन उड्डाण, नियंत्रण, सर्वेक्षण आणि छायाचित्रण यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात विद्यार्थ्यांना व संशोधकांना मोफत प्रशिक्षण, सुविधा आणि मार्गदर्शन मिळणार आहे.

 कौशल्य विकासातून रोजगाराची नवी दिशा

केवळ शिक्षणापुरता मर्यादित न राहता कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीलाही या योजनांमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. संगणक, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक प्रशिक्षण, बेकरी, व्यक्तिमत्त्व विकास यांसारख्या विविध रोजगाराभिमुख क्षेत्रांमध्ये विनामूल्य प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.

नवउद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात येणार असून, व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतल्यास त्यावरील व्याज ‘अमृत’ संस्थेकडून भरण्याची सुविधा** उपलब्ध होणार आहे. कृषी उत्पन्नावर आधारित उद्योग, कचरा व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रातही उद्योग उभारण्यासाठी प्रशिक्षण, कर्ज सुविधा आणि बाजारपेठेशी जोडण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

 मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाची पूर्तता

दरम्यान, कोल्हापूरच्या लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार हा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लिंगायत समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रगतीच्या संधी खुल्या झाल्या असून, या योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

आमदार शिवाजीराव पाटील यांनीही या निर्णयाचे स्वागत करत, आर्थिकदृष्ट्या मागास लिंगायत समाजघटकांसाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले.

समस्त लिंगायत समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. या निर्णयामुळे समाजातील युवकांना शिक्षण, कौशल्य आणि उद्योगाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळेल, असा विश्वास समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेस समस्त लिंगायत समाजाचे प्रशांत शहापुरे, जिल्हा परिषद सदस्य मनोजकुमार रणदिवे, राजशेखर तंबाके, ॲड. सुरेश पाटील, शंकर बिराजदार, अभिजित नाईकवाडे, स्वप्निल चौगुले, संतोष पाटील, प्रमोद भेंडवडे, दत्तात्रय खडके, रमेश मिठारे, विनोद कागले यांच्यासह लिंगायत समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *