मीडिया कंट्रोल विशेष वृत्त : नरेंद्र मोदी विचार मंचच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी पूनमताई तोडकर यांची निवड करण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील संघटना अधिक सक्षम करण्यासोबतच महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी जिल्हा, तालुका आणि गावपातळीपर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे विस्तारण्यावर भर दिला जाणार आहे. संघटनेच्या विचारांशी जोडलेल्या नव्या कार्यकर्त्यांना संधी देत विविध सामाजिक व संघटनात्मक उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
महिला सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देत महिलांचा सामाजिक आणि संघटनात्मक कार्यातील सहभाग वाढविण्यात येणार आहे. युवकांना संघटनेशी जोडताना शिक्षण, कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यावर भर राहणार आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांना मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्याबरोबरच स्थानिक पातळीवरील जनहिताचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. रक्तदान, आरोग्य तपासणी, शैक्षणिक मार्गदर्शन तसेच महिला व युवकांसाठी विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.
संघटनेचे कार्य केवळ राजकीय चौकटीपुरते मर्यादित न ठेवता समाजसेवा आणि जनहिताला केंद्रस्थानी ठेवून कार्य करण्याचा संकल्प पूनमताई तोडकर यांनी व्यक्त केला. आगामी काळात पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येणार असून, संघटनेच्या विस्ताराचा कृती आराखडा निश्चित केला जाणार आहे.
“संघटनात्मक ताकद वाढविण्यासोबतच सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव उपलब्ध राहणे, महिला आणि युवकांना नेतृत्वाची संधी देणे आणि जनसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणे, हा आमचा प्रमुख संकल्प आहे,” असे पूनमताई तोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले सांगितले.
दरम्यान, या निवडीबद्दल मंचाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पूनमताई तोडकर यांचे अभिनंदन करून आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
