विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून कोल्हापुरात एनडीए परीक्षेचे केंद्र सुरू करावे, खासदार धनंजय महाडिक यांची मागणी

कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील एनडीए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या विषयाकडे खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे.

सध्या एनडीए परीक्षेची केंद्रे मुंबई, ठाणे, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांमध्ये आहेत. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि आसपासच्या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना, शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. परिणामी आर्थिक खर्च, वेळ आणि मानसिक ताण अशा अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी एनडीए परीक्षेचे केंद्र कोल्हापूरमध्ये सुरू करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

या मागणीसंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेऊन, खासदार महाडिक यांनी निवेदन सादर केले. कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून, कोल्हापुरातही एनडीए परीक्षेचे केंद्र सुरू व्हावे, या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली. जर कोल्हापूरमध्ये एनडीए परीक्षा केंद्र मंजूर झाले, तर हजारो विद्यार्थ्यांचा प्रवासाचा त्रास कमी होईल, आर्थिक भार हलका होईल आणि अधिकाधिक युवकांना भारतीय सैन्यात अधिकारी होण्याच्या दिशेने संधी मिळेल, ही बाब खासदार महाडिक यांनी केंद्रीय राज्यमंत्र्यांसमोर मांडली. यावर केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *