कोट्यवधींच्या जलयोजनांचे नेमके झाले काय? शहरवासीयांचा संतप्त सवाल; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
कोल्हापूर|प्रतिनिधी, एकीकडे धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत, पंचगंगा नदीने तीन वेळा पात्र ओलांडले आहे आणि सर्वत्र मुसळधार पावसाची परिस्थिती आहे; मात्र दुसरीकडे कोल्हापूरकरांना आजही एक दिवसाआड पाणीपुरवठा सहन करावा लागत आहे. ही विसंगती आता नागरिकांच्या संतापाचा विषय ठरू लागली असून, महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर आणि लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस कमी झाल्याने महानगरपालिकेने दक्षतेचा उपाय म्हणून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. मात्र नंतर पावसाने जोरदार हजेरी लावत धरणे, तलाव आणि पंचगंगा नदी तुडुंब भरली. पूरस्थिती निर्माण होऊन प्रशासन नागरिकांना सतर्कतेचे इशारे देत असताना, शहरातील नागरिकांना मात्र अजूनही नियमित पाणी मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहराला २४ तास मुबलक पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन अनेक लोकप्रतिनिधींनी दिले. विविध जलयोजनांसाठी शासनाचा मोठा निधी खर्च झाला. तरीही नागरिकांच्या नळातून दररोज सुरळीत पाणी येत नसल्याने, या योजनांची परिणामकारकता नेमकी कुठे हरवली, असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
सध्या अनेक लोकप्रतिनिधी छोट्या-मोठ्या विकासकामांचे व्हिडिओ आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीत व्यस्त असल्याचे चित्र दिसते. मात्र शहरातील मूलभूत प्रश्न असलेल्या पाणीपुरवठ्याकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे.
भर पावसातही पाण्यासाठी नागरिकांची होणारी फरफट ही केवळ प्रशासनातील नियोजनाचा अभाव आहे की व्यवस्थेतील अन्य काही त्रुटी, याची सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त होत आहे. कारण पाणी हा चैनीचा नव्हे तर प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे.
आता कोल्हापूरकरांचा एकच प्रश्न आहे – धरणे भरली, नदी वाहू लागली; मग शहरातील नळ कोरडे का? एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय कधी मागे घेतला जाणार आणि नियमित पाणीपुरवठा कधी सुरू होणार? याचे स्पष्ट उत्तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी देण्याची वेळ आता आली आहे.
