कोल्हापुरात पक्षशिस्तीचे धडे, पण सामाजिक प्रश्नांकडे मौन

चवदार तळ्याचे आटलेले पाणी आणि राजकारणातील ओलावा; सामाजिक न्यायाच्या घोषणांपलीकडचा प्रश्न कोण सोडवणार, महाडच्या ऐतिहासिक वारशाकडे दुर्लक्ष, नागरिक पाण्यासाठी त्रस्त; कोल्हापुरात पक्षशिस्तीचे धडे, पण सामाजिक प्रश्नांकडे मौन?

कोल्हापूर विशेष वृत्त दि. ३० : सामाजिक न्याय, समता आणि वंचितांच्या हक्कांची भाषा करणाऱ्या राजकारणासमोर आज एक गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक चवदार तळ्याने भारतीय समाजव्यवस्थेला समानतेचा संदेश दिला. मात्र आज त्याच चवदार तळ्याचे पाणी विकासकामांच्या नावाखाली पावसाळ्याच्या उंबरठ्यावर आटल्याचे चित्र समोर येत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असतानाही कामांचा वेग संथ असल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी पक्ष संघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांमधील एकजूट टिकवणे आणि अंतर्गत मतभेद विसरण्याचे धडे पदाधिकाऱ्यांना दिले. पक्ष संघटनात्मकदृष्ट्या सक्षम राहणे ही निश्चितच आवश्यक बाब आहे. मात्र सामाजिक न्यायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेतृत्वाने समाजाच्या मूलभूत प्रश्नांवरही तेवढ्याच ठामपणे बोलणे अपेक्षित असल्याची भावना अनेक स्तरांतून व्यक्त होत आहे.

महाडचे चवदार तळे हे केवळ जलस्रोत नाही, तर भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील एक प्रेरणास्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच ठिकाणी अस्पृश्यतेविरुद्ध संघर्षाची मशाल पेटवली होती. आज त्या ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी निधी उपलब्ध असूनही कामांचा वेग अत्यंत मंद असल्याचे दिसत आहे. परिणामी स्थानिक नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विकासकामांचा फटका नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला बसत असेल तर त्याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.

कोल्हापुरातील बैठकीत रामदास आठवले यांनी काही राजकीय विषयांवर भाष्य केले, मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आणि आपल्या नेहमीच्या कवितांमधून उपस्थितांशी संवाद साधला. मात्र समाजातील विविध घटकांच्या न्याय, हक्क आणि विकासाशी निगडित रखडलेल्या प्रश्नांवर अपेक्षित ती स्पष्ट भूमिका दिसली नसल्याची चर्चा उपस्थित नागरिकांमध्ये रंगली.

विशेष म्हणजे पक्षप्रमुख जिल्हा दौऱ्यावर असताना सर्व पदाधिकाऱ्यांनी मतभेद विसरून उपस्थित राहावे, असे निर्देश देण्यात आले. परंतु सामाजिक न्याय मंत्रालयाशी संबंधित अनेक प्रश्न, वंचित घटकांच्या समस्या, प्रलंबित योजना आणि स्थानिक स्तरावरील अडचणी यावर अधिक ठोस चर्चा होणे अपेक्षित होते, अशी भावना काही नागरिकांनी व्यक्त केली.

वारसा जपण्यापेक्षा राजकीय व्यवस्थापनाला प्राधान्य?

महाडच्या चवदार तळ्याचा प्रश्न हा केवळ एका विकासकामाचा विषय नाही; तो सामाजिक स्मृती, ऐतिहासिक वारसा आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांशी जोडलेला आहे. एका बाजूला सामाजिक न्यायाच्या घोषणा आणि दुसऱ्या बाजूला ऐतिहासिक स्थळांच्या विकासातील संथगती यामुळे शासनाच्या प्राधान्यक्रमांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

“जनतेचा सवाल”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समानता, न्याय आणि स्वाभिमानाच्या विचारांचा वारंवार उल्लेख करणाऱ्या नेत्यांनी त्या विचारांचे प्रतीक असलेल्या स्थळांकडे आणि त्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या समाजघटकांच्या प्रश्नांकडे किती गांभीर्याने पाहिले आहे, हा प्रश्न आज पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राजकीय भाषणे, पक्षीय बैठका आणि संघटनात्मक संदेश यापलीकडे जाऊन नागरिकांच्या दैनंदिन अडचणी आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी ठोस कृती कधी दिसणार, याकडे समाजाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *