जिद्द, परिश्रम आणि देशप्रेमाची विजयी गाथा; पैलवान गौरव पाटीलचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते गौरव

कोल्हापूर, दि.५ — जिद्द, कठोर परिश्रम, शिस्त आणि देशासाठी काहीतरी मोठे करण्याची जाज्वल्य इच्छा असेल, तर ग्रामीण भागातील मातीही आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण इतिहास घडवू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे करवीर तालुक्यातील कोपार्डे गावचा होतकरू पैलवान गौरव पाटील होय.

कोपार्डे येथील कुस्ती संकुलात नियमित सराव करत घडलेल्या गौरव पाटीलने थायलंड येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत ७५ किलो वजन गटातील ग्रीको-रोमन प्रकारात रौप्य पदक पटकावून देशासह कोल्हापूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. त्याच्या या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण कुस्तीविश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंनाही नवी प्रेरणा मिळाली आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते गौरव पाटीलचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना खासदार महाडिक म्हणाले, “मेहनत, चिकाटी, सातत्य आणि देशप्रेम यांच्या बळावर मिळवलेले गौरवचे यश हे केवळ कोपार्डे गावाचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे भूषण आहे. जागतिक स्तरावरही त्याने भारताचा तिरंगा अधिक उंच फडकवावा, यासाठी महाडिक परिवार कायम त्याच्या पाठीशी राहील.”

कोल्हापूरची समृद्ध कुस्ती परंपरा आजही नव्या दमाच्या पैलवानांच्या रूपाने देशाला अभिमानास्पद यश मिळवून देत असल्याचे गौरव पाटीलच्या कामगिरीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अशा यशस्वी खेळाडूंचा सन्मान म्हणजे ग्रामीण क्रीडा संस्कृतीला मिळालेली नवी ऊर्जा असून, हीच प्रेरणा पुढील पिढीतील युवकांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती जिद्दीने पूर्ण करण्याचे बळ देणारी ठरणार आहे.

यावेळी पैलवान गुंडाजी पाटील, मारुती ऊर्फ बट्टू जाधव, बाबा शिरगांवकर, प्रा. सिकंदर कांबळे, अथर्व पाटील, समर्थ शिरगांवकर, राजू सूर्यवंशी, सर्वेश कांबळे, समर वाडेकर, शंतनू खोमडे, आर्यन मांडवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *