जिल्हा विद्युत समितीच्या अध्यक्षपदी निवड; केंद्राच्या ऊर्जा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यात अव्वल स्थान मिळवण्याचा निर्धार
कोल्हापूर, दि. ३१ मे : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ऊर्जा व वीजविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोल्हापूर जिल्हा विद्युत समितीच्या अध्यक्षपदी खासदार धनंजय महाडिक यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे केंद्र शासनाच्या विविध योजनांना अधिक गती मिळणार असून, त्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्हा राज्यात आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर विद्युत समित्यांची स्थापना करण्यात येत असून, वीजविषयक योजनांची अंमलबजावणी, लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा पोहोच, तसेच विविध प्रकल्पांवरील देखरेख ही या समित्यांची प्रमुख जबाबदारी असणार आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा विद्युत समितीची स्थापना करण्यात आली असून, तिच्या अध्यक्षपदी खासदार धनंजय महाडिक यांची निवड करण्यात आली आहे. समितीच्या उपाध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या सुधारित वितरण क्षेत्र योजना (RDSS), पीएम ई-बस योजना आणि पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना यांसारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, नागरिकांचा सहभाग वाढावा आणि योजनांचे लाभ अधिकाधिक कुटुंबांपर्यंत पोहोचावेत, यासाठी ही समिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
समितीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, जिल्ह्यातील आमदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा तसेच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यांचाही समावेश करण्यात आला आहे.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र शासनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “केंद्र शासनाच्या प्रत्येक ऊर्जा योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येतील. वीजपुरवठा, ऊर्जा बचत, सौरऊर्जा आणि वितरण व्यवस्थेतील सुधारणा यामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करू,” अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.
खासदार महाडिक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा विद्युत समिती कार्यरत होत असल्याने केंद्र शासनाच्या ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी योजना अधिक वेगाने तळागाळापर्यंत पोहोचतील आणि कोल्हापूर जिल्हा ऊर्जा विकासाच्या क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करेल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
