ज्ञानसंस्कृतीचा गौरव करणारा आगळावेगळा उपक्रम; पुष्पगुच्छाऐवजी वही, पेन व पुस्तक भेट देण्याचे आवाहन..

कोल्हापूर, प्रतिनिधी : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ, भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक आणि कोल्हापूरचे सुपुत्र ॲड. विवेकानंद घाटगे यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याच्या संचालकपदी झालेल्या निवडीचा गौरव करण्यासाठी ८ जुलै रोजी ग्रंथतुला करून भव्य जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित हा विशेष समारंभ बुधवार, दि. ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनाच्या मुख्य सभागृहात होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष भरत रसाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कायदा क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, भारतीय संविधानावरील सखोल अभ्यास, सामाजिक बांधिलकी आणि न्यायव्यवस्थेप्रती असलेल्या निष्ठेमुळे ॲड. विवेकानंद घाटगे यांनी राज्यभर स्वतंत्र व मानाचे स्थान निर्माण केले आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याच्या संचालकपदी झालेली त्यांची निवड ही कोल्हापूरसाठी अभिमानाची बाब मानली जात असून, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ॲड. घाटगे यांची ग्रंथतुला करण्यात येणार आहे. ज्ञान, वाचनसंस्कृती आणि वैचारिक परंपरेचा सन्मान करणारा हा उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. पुस्तकांच्या माध्यमातून समाजात बौद्धिक आणि सामाजिक मूल्यांची जपणूक व्हावी, हा या संकल्पनेमागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

समारंभात खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, महापौर रुपाराणी निकम, साहित्यिक व चित्रपट निर्माते डॉ. रमेश विवेकी तसेच आंबेडकरवादी नेते उत्तमदादा कांबळे यांच्या हस्ते ॲड. घाटगे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष शिक्षक नेते भरत रसाळे असून, मानवतावादी सांस्कृतिक चळवळीचे अनिल म्हमाने आणि डॉ. कपिल राजहंस हे निमंत्रक आहेत. यावेळी सुरेश केसरकर, ॲड. शोभा चाळके, ॲड. करुणा विमल, विश्वास तरटे आणि अंतिमा कोल्हापूरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

दरम्यान, आयोजकांनी सत्कारासाठी पुष्पगुच्छ, शाल किंवा श्रीफळाऐवजी वही, पेन आणि पुस्तक भेट देण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी, ज्ञानदान आणि वाचनसंस्कृतीला चालना देणारी ही संकल्पना समाजासाठी दिशादर्शक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास कायदा, शिक्षण, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पत्रकार परिषदेला भरत रसाळे, अनिल म्हमाने, सुरेश केसरकर, ॲड. करुणा विमल, मदन पवार, शंकर पुजारी, अंतिमा कोल्हापूरकर, सुनील जाधव, अभिजीत मासुर्लीकर आणि गंगाधर म्हमाने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *