महावितरणचा अजब कारभार सूचना न देता स्मार्ट मीटर बसविल्याचा आरोप;
नादुरुस्त मीटर, अवाजवी बिले आणि कार्यालयातील टोलवाटोलवीमुळे ग्राहकांचा संताप शिगेला

कोल्हापूर | प्रतिनिधी परिसरातील शेकडो वीज ग्राहकांना अचानक वाढीव वीजबिले आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नियमितपणे काहीशे रुपयांचे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना अचानक दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत बिले प्राप्त झाल्याने अनेक कुटुंबांचे मासिक आर्थिक गणित कोलमडले आहे. महावितरणच्या बिल आकारणी प्रक्रियेबाबत नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी मीटर नादुरुस्त असल्याचे कारण देत ‘आवरेज बिल’ आकारण्यात आले, तर काही ठिकाणी कोणतीही पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, हा प्रकार ग्राहकांच्या संमतीशिवाय करण्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे.

वीजबिलातील त्रुटींबाबत संबंधित कार्यालयात तक्रार करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन महिन्यांतील उष्णतेमुळे घरातील पंखे, एसी, फ्रिज, गिझर आदी उपकरणांचा वापर वाढल्याने वीज वापर वाढला, असे कारण पुढे करून ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे ग्राहकांचा रोष अधिकच वाढला आहे.

वीज ग्राहकांनी चुकीची वीजबिले तातडीने रद्द करून प्रत्यक्ष मीटर रीडिंगच्या आधारेच बिल आकारणी करावी, नादुरुस्त मीटरची निष्पक्ष तांत्रिक तपासणी करावी, तसेच पूर्वसूचना न देता बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरबाबत पारदर्शक भूमिका घ्यावी, अशी ठाम मागणी केली आहे. पूर्वीप्रमाणेच नियमित बिल प्रणाली सुरू ठेवावी, अशीही नागरिकांची अपेक्षा आहे.

परिसरातून वाढत असलेल्या तक्रारी लक्षात घेता संबंधित विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वस्तुस्थिती जनतेसमोर स्पष्ट करावी, बिल आकारणी प्रक्रियेत पारदर्शकता आणावी आणि सर्वसामान्य ग्राहकांना न्याय देणारी ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा नागरिकांचा संताप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *