कोल्हापूर | प्रतिनिधी “पुणे हे विद्येचे माहेरघर’ ही रूढ संकल्पना इतिहासाच्या कसोटीवर पूर्णपणे खरी ठरत नाही. कारण पुण्यात शिक्षणाची दारे मुख्यत्वे अभिजनांसाठी खुली होती; तर संस्थानकाळात राजर्षी शाहू महाराजांनी तब्बल ८० टक्के बहुजन समाजाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे खऱ्या अर्थाने कोल्हापूर हेच विद्येचे माहेरघर आहे,” असा ठाम आणि ऐतिहासिक संदर्भांनी समर्थित दावा इतिहास अभ्यासिका प्रा. डॉ. मंजुश्री पवार यांनी केला.
शाहू छत्रपती फाऊंडेशनतर्फे आयोजित **’राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार’ व ‘राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार‘ वितरण सोहळ्यात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमास एआयबी, पुणे येथील पोलिस अधीक्षक **मनिषा डुबुले** प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका वसुधा पवार होत्या.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे नूतन उपाध्यक्ष एम. बी. शेख तसेच शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालिका प्रा. डॉ. मंजुश्री पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
‘पुण्यात विद्या निवडकांसाठी; कोल्हापुरात सर्वांसाठी’
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दिनकर मास्तर यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा संदर्भ देताना डॉ. पवार यांनी इतिहासातील अनेक दाखले मांडले. महर्षी कर्वे यांच्या कार्याचा गौरव करतानाच तत्कालीन सामाजिक मर्यादांमुळे बहुजन महिलांना शिक्षणसंस्थेत प्रवेश मिळत नव्हता, याची उदाहरणे त्यांनी दिली. त्याउलट राजर्षी शाहू महाराजांनी जात-पात, उच्च-नीच भेद न करता शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आणि महात्मा फुले यांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड दिली, असे त्यांनी सांगितले.
‘समाजाला जागे ठेवण्याची जबाबदारी शिक्षक आणि पत्रकारांची’
शाहू विचारांचा प्रसार करणाऱ्या दोन महत्त्वाच्या घटकांचा उल्लेख करताना डॉ. पवार म्हणाल्या, “समाजाला जागृत ठेवण्याचे, अन्यायाविरुद्ध भान निर्माण करण्याचे कार्य शिक्षक आणि पत्रकार सातत्याने करीत असतात. अशा विचारधारेने समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कारांनी गौरव होणे ही सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक बाब आहे.”
‘व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या काळात संस्कार जपण्याचे मोठे आव्हान’
प्रमुख पाहुण्या पोलिस अधीक्षक मनिषा डुबुले म्हणाल्या, “राजर्षी शाहू महाराजांचा वारसा लाभलेल्या कोल्हापूरकरांनी स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे. शिक्षण, सिंचन, सामाजिक न्याय, स्त्री-सक्षमीकरण अशा प्रत्येक क्षेत्रात शाहू महाराजांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. आजच्या मोबाइल आणि ‘व्हाट्सअप युनिव्हर्सिटी’च्या युगात तरुण पिढीसमोर नवी आव्हाने उभी आहेत. कोल्हापूरचे वैभव, संस्कार आणि कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.”
अध्यक्षीय भाषणात लेखिका वसुधा पवार यांनीही शिक्षकांच्या सामाजिक जबाबदारीवर भाष्य केले.
यावेळी जेष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी, शिक्षक *बाबूराव जोतिबा वरपे*, *पांडूरंग शिवाजी पाटील*, *सुहास मनोहर शिंदे*, *श्रीरंग दिनकर अणेकर*, *शरद गुलाबराव जाधव*, *राजेंद्र नारायण चव्हाण*, *अरविंद तुकाराम पाटील**, *सागर भास्कर लकडे*, *सुदर्शन श्रीकृष्ण आंबी*, शिक्षिका *वर्षा संदीप डोईजड*, *गायत्री विश्वास मोहिते*, *सुषमा दीपक डवरी* आणि *अनुष्का अभिजित खंबाळे* यांना मानचिन्ह, मानपत्र व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष जॉर्ज क्रूझ यांनी पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. जावेद मुल्ला यांनी स्वागत केले. सिद्दीका मुल्ला व ज्येष्ठ पत्रकार नवाब शेख यांनी सूत्रसंचालन केले, तर डी. डी. पाटील यांनी आभार मानले.

When I initially ⅼeft a comment I appear to have clicked tһe
-Notifʏ me when new comments are added- checҝbox and from now
on whenever a comment is added I receivе four emails with the same сomment.
There has to be an easy method you can remove me
from that ѕervice? Many thanks!
my site :: fintechbase