महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

३७ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेला राष्ट्रीय स्तरावर गौरव; ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स’कडून ऑगस्टमध्ये सन्मान

विशेष वृत्त दि. २९ : महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या विद्युत क्षेत्रातील तब्बल ३७ वर्षांच्या उल्लेखनीय कार्याची देशपातळीवर दखल घेण्यात आली असून, ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया)’ या प्रतिष्ठित संस्थेने त्यांना ‘एमिनेंट इंजिनियर’ हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला आहे. अभियंता क्षेत्रातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या पुरस्कारामुळे महावितरणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

अमरावती येथे २१ व २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘आयईआय’च्या ४१ व्या राष्ट्रीय विद्युत अभियंता अधिवेशनात श्री. पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. याच अधिवेशनात ‘विकसित भारताचे ध्येय : एआय आणि हरित तंत्रज्ञानाद्वारे ऊर्जा क्षेत्राचा कायापालट’ या समकालीन विषयावर राष्ट्रीय चर्चासत्रही आयोजित करण्यात आले आहे.

१९२० मध्ये स्थापन झालेली आणि कोलकाता मुख्यालय असलेली ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया)’ ही देशातील अभियंत्यांची सर्वात मोठी व्यावसायिक संस्था मानली जाते. देशभरात १२५ हून अधिक स्थानिक केंद्रांच्या माध्यमातून कार्यरत असलेली ही संस्था तांत्रिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी ओळखली जाते.

“पद नव्हे, कर्तृत्व मोठे असते; समर्पित सेवेलाच राष्ट्र सर्वोच्च सन्मान देते!”

विद्युत अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर श्री. राजेंद्र पवार यांनी महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कारकीर्द सुरू केली. आपल्या कर्तृत्व, कार्यतत्परता आणि तांत्रिक नेतृत्वाच्या बळावर त्यांनी मुख्य अभियंत्यापर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. ग्रामीण भागातील दुर्गम दऱ्याखोऱ्यांमध्ये वीजयंत्रणा उभारणे, शेतकरी, घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडण्या उपलब्ध करून देणे तसेच अखंड व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

एप्रिल २०२५ पासून महावितरणचे संचालक (मानव संसाधन) म्हणून कार्यरत असलेल्या श्री. पवार यांनी प्रशासन, तांत्रिक नियोजन आणि मनुष्यबळ व्यवस्थापन या क्षेत्रांतही प्रभावी नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यांच्या दीर्घकालीन समर्पित सेवेला आणि ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाला मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान राज्यातील अभियंत्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *