‘रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल’चा दिमाखदार शुभारंभ; पहिल्याच दिवशी हाऊसफुल प्रतिसाद

दिग्गज कलाकारांचा गौरव, प्रेक्षकांचा उसळलेला उत्साह आणि सिनेमॅटिक वीकेंडची रंगत

विशेष वृत्त-: मराठी चित्रपटसृष्टीचा गौरव, दर्जेदार चित्रपटांचा उत्सव आणि रसिकांच्या अफाट प्रेमाचा संगम ठरलेल्या ९३.५ रेड एफएम आयोजित ‘सुपरहिट्स मराठी फिल्म फेस्टिव्हल’च्या सहाव्या पर्वाचा शुक्रवारी पुण्यातील ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्स येथे अत्यंत दिमाखदार वातावरणात शुभारंभ झाला. २२ ते २४ मे २०२६ या कालावधीत रंगणाऱ्या या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पुणेकरांनी प्रचंड गर्दी करत महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. थिएटर परिसरात दिवसभर उत्साहाचे आणि सिनेरसिकांच्या जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध परंपरेचा गौरव करणाऱ्या या उद्घाटन सोहळ्याने उपस्थितांची मनं जिंकली. ‘प्राईड ऑफ मराठी सिनेमा’ या मानाच्या किताबाने राष्ट्रीय पुरस्कार विजेते, दिग्गज अभिनेते आणि चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंतांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या प्रदीर्घ आणि बहुमोल योगदानाचा विशेष सन्मान सोहळ्याचे आकर्षण ठरला. त्यांच्या गौरवावेळी सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.

यावेळी ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटासाठी दिग्दर्शक आशीष बेंडे, ‘श्यामची आई’साठी सुजय डहाके, ‘नाळ २’साठी सुधाकर रेड्डी यक्कंती यांचा गौरव करण्यात आला. तसेच ‘नाळ २’मधील बालकलाकार त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक करण्यात आले. अभिनेता कबीर खंदारे यांना ‘जिप्सी’ चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी सन्मानित करण्यात आले, तर लोककलेचा अनोखा सिनेमॅटिक आविष्कार सादर करणाऱ्या ‘दशावतार’लाही विशेष गौरव प्राप्त झाला.

 

या सोहळ्यात अभिनेता सिद्धार्थ जाधव यांना ‘पॉवरहाउस परफॉर्मर ऑफ द इयर’ हा किताब बहाल करण्यात आला. आपल्या अफाट ऊर्जेने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. अभिनेत्री गिरिजा ओक यांना ‘मराठी दिवा ऑफ द इयर’ हा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या सौंदर्यपूर्ण आणि कसदार अभिनयाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.

पुरस्कार वितरणानंतर तरुण दिग्दर्शक शुभम शेवडे दिग्दर्शित ‘मॅगझिन’ या चित्रपटाच्या प्रीमियर स्क्रीनिंगने महोत्सवाची दमदार सुरुवात झाली. चित्रपटाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. पहिल्याच दिवशी थिएटर पूर्णपणे हाऊसफुल झाले होते. कलाकारांशी संवाद साधण्यासाठी आणि सेलिब्रिटींना जवळून अनुभवण्यासाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली.

२४ मेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवामुळे पुण्यातील चित्रपटप्रेमींना एक अनोखा सिनेमॅटिक अनुभव मिळत आहे. विशेष म्हणजे हा महोत्सव सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य खुला असून, दर्जेदार चित्रपटांसोबतच आपल्या लाडक्या कलाकारांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी रसिकांना लाभत आहे. युनिव्हर्सिटी रोडवरील ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्स येथे सुरू असलेला हा महोत्सव सध्या पुणेकरांसाठी आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *