कोल्हापूर, दि. १४ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (BLO) शंभर टक्के डिजिटायझेशनची उल्लेखनीय कामगिरी करत कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रगणना अर्जांचे वाटप, संकलन आणि बीएलओ ॲपद्वारे शंभर टक्के डिजिटायझेशनची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या या अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सन्मान सोहळ्यास उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मोहिनी चव्हाण, उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे यांच्यासह संबंधित बीएलओ अधिकारी उपस्थित होते. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रत्येक बीएलओने याच समर्पित भावनेने काम सुरू ठेवावे, असे आवाहन केले.
मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ही संपूर्ण प्रक्रियेतील महत्त्वाची कडी आहे. प्रत्येक मतदाराच्या दारापर्यंत पोहोचून प्रगणना अर्जांचे वितरण, भरलेले अर्ज स्वीकारणे आणि त्यांचे बीएलओ ॲपमध्ये तातडीने डिजिटायझेशन करणे ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडणाऱ्या आठ अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षमतेची वेगळी छाप उमटविली.
या सन्मानाचे मानकरी म्हणून राधानगरी विधानसभा मतदारसंघातील बरगेवाडी येथील अंगणवाडी सेविका शितल संदीप पाटील, भुदरगड तालुक्यातील देवकेवाडी येथील कृषी सहाय्यक अमित शिवाजी सुतार, चिक्केवाडी येथील ग्राम महसूल अधिकारी विनोद तुकाराम गुरव, राधानगरी तालुक्यातील हणबरवाडी येथील ग्राम महसूल अधिकारी विवेक बाळासो पाटील, करवीर विधानसभा मतदारसंघातील शेळकेवाडी येथील ग्रामपंचायत अधिकारी सुरेखा निवास आवाड, पाटेकरवाडी येथील ग्रामपंचायत लिपिक सुभाष शंकर पाटील तसेच शिरोळ विधानसभा मतदारसंघातील शिरढोण येथील अंगणवाडी सेविका छाया सुरेश मोरडे आणि अलका सागर बिरोजे यांचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यात SIR मोहिमेसाठी एकूण ३ हजार ४५० बीएलओ कार्यरत असून सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील ३३ लाख ५५ हजार २४४ मतदारांसाठी तेवढ्याच प्रगणना अर्जांची छपाई करण्यात आली आहे. १३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत २५ लाख ९६ हजार ३४३ अर्जांचे वितरण पूर्ण झाले असून हे प्रमाण ७७.३८ टक्के आहे. यापैकी ८ लाख १ हजार ६९४ अर्जांचे बीएलओ ॲपमध्ये डिजिटायझेशन पूर्ण झाले असून त्याचे प्रमाण २३.८९ टक्के आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी या यशस्वी मोहिमेत योगदान देणाऱ्या सर्व बीएलओंचे कौतुक करत नागरिकांनीही प्रगणना अर्ज वेळेत भरून देऊन निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन केले. मतदार यादीची विश्वासार्हता आणि अचूकता वाढविण्यासाठी प्रशासन व नागरिकांचा सक्रिय सहभाग तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
