हायटेक हॉस्पिटल हटवा; लेकव्हिस्टा रहिवासी वसाहत वाचवा – रहिवाशांची तीव्र मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अंबाई टँक, रंकाळा पार्क परिसरातील परांजपे लेकव्हिस्टा अपार्टमेंट या निवासी वसाहतीमध्ये सुरू असलेल्या हायटेक हॉस्पिटल आणि औषध दुकानामुळे परिसरातील रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याचा आरोप करत लेकव्हिस्टा, कायझन अपार्टमेंट, बंगले व रो-हाऊसधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात महानगरपालिकेने तातडीने हस्तक्षेप करून योग्य कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, निवासी वसाहतीमध्ये सुरू असलेल्या हॉस्पिटलमुळे दिवस-रात्र ॲम्बुलन्स, शववाहिका, प्रयोगशाळेची वाहने, रुग्णवाहिका तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या चारचाकी व दुचाकी वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. त्यामुळे परिसरातील शांतता पूर्णपणे भंग झाली असून नागरिकांना घराबाहेर पडणेही अनेकदा अडचणीचे ठरत आहे.

हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या वाहनांचे रस्त्यावर होणारे अव्यवस्थित पार्किंग हा आणखी एक गंभीर प्रश्न बनला आहे. त्यामुळे रहिवाशांना स्वतःची वाहने आत-बाहेर काढताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय काही रुग्णांचे नातेवाईक परिसरात अस्वच्छता करत असल्याने आरोग्य व स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाल्याचे रहिवाशांनी नमूद केले आहे.

या परिस्थितीबाबत हॉस्पिटल प्रशासन, व्यवस्थापन तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. परिणामी विद्यार्थी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना मोठ्या प्रमाणात मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

महानगरपालिका, अन्न व औषध प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी निवासी क्षेत्रात अशा प्रकारच्या हॉस्पिटलला परवानगी कशी दिली, याची चौकशी व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकेने संबंधित इमारतीचा मूळ मंजूर नकाशा तपासून नियमांचे पालन झाले आहे का, याची सखोल चौकशी करावी. इमारतीच्या मागील बाजूस स्वतंत्र प्रवेशमार्ग उपलब्ध असल्याने हॉस्पिटलचा प्रवेश तेथूनच करण्यात यावा किंवा आवश्यक असल्यास सध्याचे प्रवेशद्वार बंद करून निवासी परिसर पूर्णपणे वेगळा करण्यात यावा, अशीही सूचना रहिवाशांनी केली आहे.

याचबरोबर परिसरातील इतर व्यावसायिक आस्थापनांनाही परवानगी कशा प्रकारे देण्यात आली, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून रुग्ण व नातेवाईकांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था नसताना हॉस्पिटल सुरू ठेवणे योग्य नसल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे.

महानगरपालिकेने या सर्व मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा लेकव्हिस्टा, कायझन अपार्टमेंट, बंगले, रो-हाऊसधारक आणि रंकाळा पार्क परिसरातील रहिवासी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *