आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताचा तिरंगा डौलाने फडकवणाऱ्या युवा पैलवानाच्या यशाला मानाचा मुजरा
कोल्हापूर, दि. ९ जून : कागल तालुक्यातील एकोंडी गावच्या मातीत घडलेल्या युवा पैलवान अक्षय तानाजी ढेरे याने व्हिएतनाम येथे झालेल्या अंडर-२३ सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत ५७ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावत देशासह कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावला आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी अक्षय ढेरे याचा विशेष सन्मान करून त्याच्या कर्तृत्वाचा गौरव केला.
प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत, कठोर परिश्रम, चिकाटी आणि अपार जिद्दीच्या जोरावर अक्षयने हे यश संपादन केले आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करत त्याने भारतीय तिरंगा अभिमानाने फडकवला असून कोल्हापूरच्या पारंपरिक कुस्ती संस्कृतीची ताकदही जगासमोर सिद्ध केली आहे.

यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी अक्षयच्या यशाचे कौतुक करताना सांगितले की, “अक्षय ढेरे याची कामगिरी ही केवळ वैयक्तिक यश नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. कठोर मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्याने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याचा हा प्रवास राज्यातील हजारो युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा ठरेल. आगामी जागतिक स्पर्धांमध्येही तो यशाची नवी शिखरे सर करो, यासाठी महाडिक कुटुंब कायम त्याच्या पाठीशी राहील.”
सन्मान सोहळ्यात अक्षय ढेरे याचे अभिनंदन करत उपस्थितांनी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संभाजी शिंदे, असिफ मुल्लाणी, तानाजी ढेरे, वस्ताद बाळासो राजगिरे, मार्गदर्शक युवराज पाटील, सागर मगदूम, रविंद्र कुंभार, मदन चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
अक्षय ढेरेच्या सुवर्णमयी कामगिरीमुळे एकोंडी गावासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, या यशामुळे कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेत आणखी एका सुवर्ण अध्यायाची भर पडली आहे.
