कोल्हापूर/प्रतिनिधी : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ३१ मार्च रोजी काढण्यात आलेल्या आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले आहे. या आरक्षणावर आलेली एकमेव हरकतीवर पालिका प्रशासनाने निकालात काढल्याने मार्ग मोकळा झाला. निश्चित झालेल्या आरक्षणानुसार ९२ पैकी ४६ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १२, तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी १, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७९ जागा आहेत. दुसरीकडे मतदार याद्यांचे काम महापालिकेतून हाती घेण्यात आले आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणूक प्रथमच तीन सदस्यीय पद्धतीने होईल. कोल्हापूर शहरातील ३१ प्रभागातील ९२ नगरसेवकांसाठी ३१ मे रोजी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यावर ६ जूनपर्यंत हरकत घेण्याची मुदत होती. या कालावधीमध्ये एकमेव हरकत दाखल झाली होती. अनुसूचित जातीची लोकसंख्या असलेल्या प्रभागातील तिन्ही जागा अनुसूचितसाठी आरक्षित करण्यासाठी हरकत दाखल करण्यात आली होती. मात्र, नियमाने असे होत नसल्याने हरकत निकाली निघाली.