विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२७ : कट्टर शिवसैनिकानी पक्षप्रमुखांचा हा वाढदिवस मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करत असून कोल्हापूर शहरात सकाळपासूनच शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. दसरा चौकातून बाईक रॅली काढण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी झाले असून आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत अशा प्रकारचे फलकही हातात घेण्यात आले होते.
पक्षात बंड झाल्यानंतर शिंदे गटात कोल्हापुरातील दोन आमदारांचा सहभाग होता. ज्यामध्ये आमदार प्रकाश आबिटकर आणि राजेंद्र पाटील यड्रावकर हे गेले होते. सोबतच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हेही एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाल्याने कोल्हापुरातील निष्ठावंत आणि आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी निष्ठा यात्रा काढली होती. यामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांसह खासदार संजय मंडलिक हे देखील सहभागी झाले होते. मात्र यानंतर काही दिवसातच तेही एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाल्याने यावेळी मात्र या बाईक रॅलीमध्ये ते दिसून आले नाही. यामुळे शिवसैनिकांकडून व पदाधिकाऱ्यांवरून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.