कोल्हापूर : पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत व्यतीत करुन शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम दि. १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.या उपक्रमात प्रधान सचिव (कृषी), आयुक्त (कृषी), कृषी संचालक, कृषी विद्यापीठांचे कुलगुरु, विद्यापीठांचे विभाग प्रमुख, कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता, विभागीय आयुक्त, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), कृषी विकास अधिकारी, कृषी उपसंचालक, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) व इतर जिल्हास्तरीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी (महसूल), उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी सहभागी होणार आहेत. कृषी विभागाचे अधिकारी महिन्यातून तीन दिवस तसेच महसूल, ग्रामविकास व इतर विभागांचे अधिकारी महिन्यातून एक दिवस गावांना भेटी देतील.
या उपक्रमात भेट देणाऱ्या गावाची निवड करताना दुर्गम, डोंगराळ, कोरडवाहू, आदिवासी, सामाजिक व दुर्बल असणाऱ्या क्षेत्राची निवड करण्यात येणार आहे. संबंधित अधिकारी, पदाधिकारी त्यांच्या मुख्यालयापासून दूरची गावे निवडणार असून शक्यतो कोरडवाहू शेतकऱ्याची भेट घेतील.
उपक्रम कालावधीत देण्यात येणारी माहिती याप्रमाणे-
अधिकारी, पदाधिकारी यांनी गावाची निवड केल्यानंतर गावातील शासकीय, निमशासकीय, अशासकीय संस्था, गावातील बँक, सोसायटी, दुध संस्था, यांच्याकडून शेतकऱ्यांना कशाप्रकारे लाभ, मदत देतात याबाबत चर्चा.शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे येणारे उत्पादन, खर्च व बचत याबाबत शेतकऱ्यांना सोबत अनौपचारिक चर्चा करणे.शेतकऱ्यांची नैराश्याची कारणे शोधून त्यासंदर्भात कोणते धोरणात्मक निर्णय घेता येतील याचा अहवाल तयार केला जाईल.
भेट देणाऱ्या गावामध्ये ग्राम कृषी विकास समितीची बैठक घेऊन त्यामध्ये पीक पद्धती, शेतकरी वापरत असलेले तंत्रज्ञान याबाबत सविस्तर चर्चा.शेतकऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेबाबतच्या योजनांबाबत लाभार्थ्यांना भेटून चर्चा.अधिकारी, पदाधिकारी आपल्या यंत्रणेमार्फत ज्या विविध योजना राबवितात त्यांची माहिती देण्यात येईल.विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी विभागातील अधिकारी नवनवीन तंत्रज्ञानाची पीकनिहाय वाणांची माहिती, गावामध्ये बैठका घेऊन देण्यात येईल.नवीन आधुनिक तंत्रज्ञान अवलंब करणाऱ्या व अधिक उत्पादन घेणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी.गावातील शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गट, महिला बचत गट, गटशेती उपक्रम इत्यादी माध्यमातून यशस्वी झालेल्या उपक्रमांना भेटी तसेच शेतकऱ्यांना भेटून त्यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगिरे यांनी कळविले आहे.