दसरा मेळाव्यात शिवसेनेचाच आवाज घुमणार…उच्च न्यायालयाचा शिंदे गटाला दणका…!

मुंबई : 

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटाच्यादृष्टीने प्रतिष्ठेच्या झालेल्या दसरा मेळाव्याच्या लढाईत उद्धव ठाकरे गटाची सरशी झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी शिवसेनेच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीअंती शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास हिरवा कंदील दाखवला. उच्च न्यायालयाचा हा निर्णय शिवसेनेसाठी उत्साह दुणावणारा आहे. पालिकेने शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांनाही शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी नाकारली होती. त्यानंतर शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर शुक्रवारी उच्च न्यायालयात जवळपास साडेतीन तास युक्तिवाद करण्यात आला. शिवसेना, पालिका आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून आपापली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने पालिकेचा निर्णय योग्य, उचित नाही असा शेरा मारत ठाकरेंना शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला परवानगी दिली आहे. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याची हमी ठाकरेंच्या वकिलांनी न्यायालयात दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *