चॅनल बी च्या वतीने आयोजित घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न …!

कोल्हापूर : गणरंग सारख्या स्पर्धांच्या माध्यमातून प्रत्येक कुटूंबातील सृजनशिलतेला आणि नाविन्यपूर्ण कलात्मकतेला मंच उपलब्ध करून देण्याचे काम चॅनल बी च्यावतीने केले जातेय. यावर्षीच्या स्पर्धेला जिल्हयातून उदंड प्रतिसाद मिळाला असून, पुढील वर्षीही व्यापक स्वरूपात स्पर्धेचे आयोजन केले जाईल, असे प्रतिपादन चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी केले. चॅनल बी च्या वतीने आयोजित घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात ते बोलत होते. घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत फुलेवाडीच्या शामराव पाटील यांनी प्रथम क्रमांक, तर दहीहंडी फोटोग्राफी स्पर्धेत छायाचित्रकार बी डी चेचर यांनी सर्वोत्कृष्ट छायाचित्राचे बक्षिस पटकावले.

चॅनल बी च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घरगुती गणेशोत्सव सजावट, सार्वजनिक गणेशोत्सव सजावट आणि दहीहंडी फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेला जिल्हयातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण आज हॉटेल अयोध्या इथं करण्यात आले. चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक आणि बी न्यूजचे संपादक चारूदत्त जोशी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गटात डांगे गल्ली तरूण मंडळ आणि शाहुपूरीतील शिवतेज मित्र मंडळाने बक्षिस पटकावले. तर घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत फुलेवाडीच्या शामराव पाटील, कागल तालुक्यातील म्हाकवे इथल्या अमित पाटील आणि शिवाजी पेठेतील अनुप चौगले यांनी अनुक्रमे प्रथम-द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. तसेच सचिन गायकवाड, पुनम चव्हाण, सुरज जाधव आणि निशांत पोतदार यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. धनंजय महाडिक युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेवेळी घेण्यात आलेल्या फोटोग्राफी स्पर्धेचे बक्षिस वितरणही आज करण्यात आले. त्यामध्ये बी डी चेचर यांनी प्रथम क्रमांक, प्रणित चौगले याने द्वितीय क्रमांक, तर नाज अत्तार याने तृतीय क्रमांक पटकावला. शरद पाटील आणि अर्जुन टाकळकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे आयोजन, परिक्षण आणि स्वरूपाबाबत संपादक चारूदत्त जोशी यांनी माहिती दिली. तर स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पृथ्वीराज महाडिक यांनी समाधान व्यक्त केले. परीक्षक अनंत यादव आणि नागेश हंकारे यांनी स्पर्धकांच्या कलात्मक अविष्काराबद्दल समाधान व्यक्त केले. या स्पर्धेचे प्रायोजक अर्जुन ऑईल रिफायनरीचे व्यवस्थापक सुभाष सुर्वे आणि परिक्षकांचा विशेष सत्कार पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. तर क्वॉलिटी इंडस्ट्रीजचे अजित चौगुले, शिर्डी टीएमटी बारचे अलोक बन्सल, ऋत्विक बन्सल, वासू बन्सल यांचे विशेष आभार मानण्यात आले. यावेळी स्पर्धक आणि त्यांचे कुटूंबिय उपस्थित होते.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *