मुंबई : शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा |शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते | हे ब्रिद वाक्य घेऊन नवीन वर्षाचे स्वागत आणि २०२३ या वर्षातील उपक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी ‘शोध’ फाउंडेशन तर्फे ग्रीन इंडिया इनशिएटिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कंपनीचे संस्थापक (सोलार मॅन) सचिन शिगवण यांच्या उपस्थितीत विरार येथील भाताणे ग्रामपंचायत, मधील विविध आदिवासी पाड्यांच्या शाळकरी विद्यार्थ्यांना एकूण ५१ सोलार स्टडी लॅम्पचे वाटप केले.
या सोबतच जि.प. शाळा येथील विद्यार्थिनी आणि तरुण मुलींमध्ये मासिक पाळी तसेच चांगला व वाईट स्पर्शाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी शोध फाउंडेशनच्या महिला स्वयंसेवीकांनी सदर विषयांवर उपस्थित आदिवासी पाड्यातील तरुणींशी संवाद साधला.
शोध तर्फे भाताणे गावातील पाड्यांमधील शैक्षणिक परिस्थितीबाबत सविस्तर आढावा घेण्यासाठी सर्वे घेतला असून येथे राहणाऱ्या मुलांची आणि मुलींच्या शिक्षणाची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा आणि त्या दृष्टीने गावातील मुलांसाठी भविष्यात शिक्षणाचे नवनवीन मार्ग उपलब्ध करून देण्याचा फाउंडेशनचा प्रयत्न असणार आहे.
शोध फाउंडेशन सामाजिक कार्यासाठी स्थापन केली असून ती गेल्या एक वर्षापासून कार्यरत आहे. गेल्या वर्षभरात १२ पेक्षा जास्त उपक्रम शोधतर्फे आयोजित करण्यात आले आहेत. शैक्षणिक सोईंपासून वंचित असणाऱ्या मागासवर्गीय शाळकरी गट तसेच गैर लाभार्थी समुदायातील लहान मुलांसाठी शिक्षणाच्या सहाय्याने योगदान देत एक परिपूर्ण जग निर्माण करणे हे संस्थेचे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्यासाठी गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणे, मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी उपक्रम घेणे, ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण देणे, उच्चस्तरीय शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करणे, सध्या मिळणारे शालेय शिक्षण मुलांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेच; त्याचबरोबर मुलांना शालेय शिक्षणाबरोबर स्पर्धात्मक परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्याचे उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना शिकवण्या देणे, शिक्षणाबरोबर खेळासाठी देखील प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करणे, वयोमानानुसार शैक्षणिक पात्रता असणाऱ्या सर्व लहान मुले, आणि विद्यार्थ्यांना जीवनकौशल्यांचे शिक्षण देत त्यांना प्रौढत्वाच्या संक्रमणामध्ये भरभराट यावी अशा शिक्षणाचा पाया तयार करणे हे संस्थेचे ध्येय आहे.