कोल्हापूर : युवकांनी सुरक्षितपणे वाहन चालवून स्वतःच्या जीवाचे संरक्षण करत कुटुंबाचे आणि राष्ट्राचे हित जपावे, असा मौलिक सल्ला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी दिला.
रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने केआयटी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रख्यात सिने अभिनेते भरत जाधव, अपर पोलीस अधीक्षक (गडहिंग्लज) निकेश खाटमोडे- पाटील, के.आय.टी. महाविद्यालयाचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, विश्वस्त दीपक चौगुले, संचालक मोहन वणरोट्टी, प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
कविता अग्रवाल म्हणाल्या, जन्म आणि मृत्यू यामधील प्रवास म्हणजे जीवन असून जीवन जगताना काळजी घ्यायला हवी. मुलांना वाहन, मोबाईल अशा वस्तू पालकांनी घेऊन दिल्या असल्या तरी ते वाहन सुरक्षितपणे चालवण्याचा सल्ला ऐकायला मात्र आवडत नाही. मात्र युवकांनी वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षितपणे वाहन चालवून कौटुंबिक हित साधावे.
सिने अभिनेते भरत जाधव म्हणाले, सध्याच्या युगात प्रत्येक गोष्टीत स्पर्धा आहे, त्यात अग्रेसर राहण्यासाठी प्रत्येकजण धडपडतो आहे, प्रत्येकजण घाईत आहे. परंतू जीवन अमूल्य आहे, त्यामुळे वाहन चालवताना घाई, गडबड किंवा स्पर्धा करु नका. रस्ता सुरक्षेचे नियम पाळा, स्वतः सुरक्षित वाहन चालवा आणि इतरांनाही प्रेरित करा. चांगले विचार आत्मसात करुन विचारांनी मोठे व्हा, अभ्यास करुन कष्ट करुन मोठे व्हा, चांगले नाव कमवा असे आवाहन त्यांनी केले.
प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील म्हणाले, देशात वर्षभरात रस्त्यावर लाखो अपघात होवून लोकांना जीव गमवावा लागतो. रस्ता सुरक्षेबद्दल जनजागृती होण्यासाठी परिवहन विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह उपक्रम राबवण्यात येतो. या सप्ताहात जिल्ह्यात विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. इंस्टाग्रामवर रस्ता सुरक्षा विषयक रिल (Reel) स्पर्धा, महिलांसाठी रस्ता सुरक्षा बाईक रॅली आदी उपक्रमांत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच प्रत्येकाने वाहतुक नियमावलीचे तंतोतंत पालन करावे, असेही आवाहन त्यांनी केले.
यावेळी निकेश खाटमोडे – पाटील, सुनील कुलकर्णी यांनी मनोगतातून रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. आभार सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी मानले.