मकर संक्रांती-भोगी दिवस पौष्टिक तृणधान्य दिन उत्साहाने साजरा करण्याचे कृषि विभागाचे आवाहन…..!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर

सांगली : संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. मकर संक्रांती-भोगी हा दिवस राज्यामध्ये “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.

        सर्व सामान्य लोकांपर्यंत पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्याचे फायदे काय आहेत याबरोबरच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढ कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत “मकर संक्रांती-भोगी” हा सणाचा दिवस दरवर्षी राज्यामध्ये “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून साजरा करण्याबाबत सूचित केले आहे. या दिनाचे औचित्य साधून प्रत्येक कृषि सहाय्यक गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकांपासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ यांची माहिती देण्यासाठी प्रगतीशील शेतकरी, आहार तज्ज्ञ, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करून कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचे कृषि विभागाकडून कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *