Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : दूध व्यावसायिकांना पशुसंवर्धनाचे ज्ञान आणि डेअरीच्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या इंडियन डेअरी फेस्टिवल २०२३चे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चितळे डेअरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्र्वास चितळे, पुणे जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष श्रीमती कांचनताई पवार, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष हिंदुराव जाधव, गोकुळचे माजी संचालक अरुण नरके, परिषदेचे आयोजक चेतन नरके उपस्थित होते.
परिषदेच्या पहिल्या सत्रात अनुप कुमार (अप्पर मुख्य सचिव, सहकार आणि पणन, महाराष्ट्र शासन), राजीव मित्रा (सीईओ, प्रभात डेअरी), निरंजन कराडे (टीम लीडर, इनोव्हेशन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट सेल, NDDB), योगेश गोडबोले (व्यवस्थापकीय संचालक, गोकुळ दूध संघ) यांनी दुग्ध व्यवसायातील बदलती परिस्थिती या विषयावर मार्गदर्शन केले.
दूध व्यवसायाच्या वाढीसाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज भासणार आहे : आमदार सतेज पाटील…..
१९७० साली भारतात Operation Flood सुरु झाले. त्यामुळे दूध व्यवसायात क्रांती झाली. सध्या दूध व्यवसायात Operation Sustainability and Stability राबविण्याची गरज आहे. NDDBने यात लक्ष घालून दूध व्यावसायिकांना सर्वतोपरी सहकार्य करावे अशी विनंती आ.सतेज पाटील यांनी या परिषदेच्या माध्यमातून केली.
दूध उत्पादनात भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. भविष्यात दूध व्यवसायात व्यावसायिक स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे. यासाठी दूध व्यवसायाचं ब्रॅण्डिंग, नव्या संकल्पना, नवीन तंत्रज्ञानाचा, माहितीचा वापर करण्यासाठी NDDB ने मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. दूध व्यवसायाच्या वाढीसाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. जनावरांची योग्य गणना आपल्याकडे असणे आवश्यक आहे. ज्यामुळे जनावरांची संख्या व एकूण दूध उत्पादन यांचा ताळमेळ घालता येईल असे मत यावेळी आमदार सतेज पाटील यांनी मांडले. या कार्यक्रमाला गोकुळचे संचालक सुजित मिणचेकर, बाबासो चौगले, नंदकुमार ढेंगे, प्रा. किसन चौगले, यळगूडचे लोकनियुक्त सरपंच सुजित मोहिते यांच्यासह मान्यवर, दूध उत्पादक व्यावसायिक उपस्थित होते.
दरम्यान सायंकाळी शाहपुरी जिमखाना मैदानावर माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील,ना. हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं.