Getting your Trinity Audio player ready...
|
विसापूर : पैलवान सिकंदर शेख याने तासगाव तालुक्यातील विसापूर येथे झालेल्या विसापूर केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं आहे. अवघ्या काही मिनिटात सिकंदरने पंजाबचा पैलवान नवजीत सिंगला सिकंदरने मोळी डावावर लोळवत कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेत देशभरात सर्वाधिक चर्चा झालेल्या पैलवान सिकंदर शेखची ५ लाख रुपयांसाठीची ही कुस्ती होती. राज्यभरातून कुस्ती शौकिनांनी यावेळी विसापूर येथे उपस्थिती लावली होती. यल्लमा देवी यात्रेनिमित्त भारतातील नामवंत मल्लांच्या उपस्थितीत कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रासह इतर राज्यातून मल्ल कुस्तीसाठी आल्यामुळे या मैदानाला विशेष महत्व होते. अंतिम सामन्यात सिकंदरने आपला खेळ दाखवत सुरुवातीपासून पंजाबच्या नवजीत सिंग याच्यावर वर्चस्व मिळवलं. जसजशी वेळ पुढं जात होती तसतसं सिकंदर आपली पकड घट्ट करत होता. अखेर नवजीत सिंगला नामोहरण करण्यासाठी सिकंदरने आपला हुकमी मोळी डाव टाकला आणि कुस्ती चितपट करत या खेळात आपण सिकंदर का आहोत, हे दाखवून दिलं.