कोल्हापूर : सात दिवस चालणाऱ्या आणि तीस लाखावर लोकांच्या उपस्थितीने भव्य आणि दिव्य होणाऱ्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाचा सोमवारी शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत. शिवजयंतीच्या निमित्ताने कोल्हापुरात भव्य शोभायात्रा काढून या महोत्सवाचा अनौपचारिक प्रारंभ झाला. श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठावर होत असलेल्या या लोकोत्सवात पर्यावरण जागृतीचा संदेश दिला जाणार आहे.
कणेरी मठाचे मठाधिपती पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव होत आहे. भव्य शोभायात्रा आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या पंचगंगा नदीच्या आरतीने त्याचा अनौपारिक शुभारंभ झाला. सोमवार दि. २० फेब्रुवारी रोजी दहा वाजता मुख्यमंत्री शिंदे , उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शशीकला जोल्ले यांचे मठावर आगमन होईल.
तारांगणचे उद्घाटन, प्रदर्शन गॅलरी, स्टॉल, सोळा संस्कार गॅलरी, पंचमहाभूततत्व गॅलरी, सेंद्रिय शेती यासह अनेक ठिकाणी सर्व मान्यवर भेट देतील. पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी हे या सर्वांची माहिती देतील. सकाळी अकरा वाजता मुख्य सभामंडपात शुभारंभाचा कार्यक्रम सुरू होईल. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सुमंगलम विचार संपदा पुस्तकाचे आज प्रकाशन
श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठाचे मठाधिपती पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या विचारांचा संग्रह असलेल्या ‘सुमंगलम विचार संपदा’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ सोमवार दि. २० फेब्रुवारी रोज होत आहे. पत्रकार गुरूबाळ माळी यांनी शब्दाकंन केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल.
कोल्हापुरातील अक्षर दालन प्रकाशन हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्याचे कन्नड अनुवाद संपदा’ या अनुवाद डॉ. प्रा. ए.बी. घाटगे यांनी केले आहे. प्रकाशन समारंभ सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव शुभारंभ या कार्यक्रमात होईल.