कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. नागरीकांची मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
महापालिकेच्या चार विभागीय कार्यालयाअतंर्गत मुख्य रस्त्यावर अंतर ठेवून पट्टे मारुन भाजी विक्रेत्यांना बसविण्यात आले आहे. भाजी विक्री व किराणा विक्रीच्या ठिकाणी नागरीकांनी ठरावीक अंतरावर उभे राहणेसाठी गोलाकार अथवा चौकोन मारण्यात आलेले आहेत. परंतू सध्या मार्केटमध्ये भाजी खरेदीस गर्दी वाढू लागली आहे.
मुख्य मार्केटच्या ठिकाणी वारंवार सुचना देऊनही या ठिकाणी गर्दी वाढू लागल्याने आज सकाळी कपिलतीर्थ मार्केट महाद्वार रोड, पाडळकर मार्केट गंगावेश, पापाची तिकटी, लक्ष्मीपूरी, शिंगोशी मार्केट, नार्वेकर मार्केट याठिकाणी रस्त्यावर भाजी विक्रीस मनाई करण्यात आली आहे. याठिकाणी असलेल्या विक्रेत्यांना टँम्पो मधून अथवा हातगाडीतून मुख्य चौकामध्ये, गल्लीमध्ये, उपनगरामध्ये भाजी विक्री करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच दोन विक्रेत्यामध्ये कमीत कमी शंभर फूटाचे अंतर ठेवणे जरुरी आहे. याचे उल्लंघन केल्यास विक्रेत्याचा माल जप्त करण्यात येणार आहे.
सकाळी आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी गंगावेश, कपीलतीर्थ मार्केट, डोर्ले कॉर्नर याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी टँम्पो मधून अथवा हातगाडीतून भाजी विक्रेंत्यांनी भाजी देतांना दोन नागरीकांमध्ये ठरावीक अंतरावर ठेवा, एका ठिकाणी गर्दी होऊ देऊ नका, फिरते रहा अशा सुचना दिल्या. या फिरती वेळी महाद्वार रोड येथे डी.डी.शेटे यांच्या किराणा मालाच्या दुकानात माल घेतांना दोन नागरिक आढळून आले त्यापैकी एका जेष्ठ नागरिकांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. त्यांना आयुक्तांनी कोठेही बाहेर फिरतांना मास्क लावण्याच्या सुचना देऊन आपल्या जवळील हात रुमाल मास्क म्हणून लावण्यासाठी त्यांना दिला.
यावेळी नगरसेवक शेखर कुसाळे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार, अतिक्रमण विभाग प्रमुख पंडीत पोवार आदी उपस्थित होते.