मुंबई : मुंबई विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिले जावे याबाबत उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. त्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानेदेखील किमान वेतन देण्याबाबत अंतरिम आदेश दिल्यानंतर त्यांना किमान वेतन दिले जात असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधान परिषदेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.सदस्य विलास पोतनीस यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.
मुंबई विद्यापीठातील या कर्मचाऱ्यांना वेतनाबरोबरच इतर आर्थिक लाभ दिले जावेत या उपप्रश्नाबाबत अधिक माहिती देताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना विद्यापीठामार्फत वेतन दिले जाते. तथापि याबाबत विद्यापीठाच्या संबंधित अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊन याबाबत चर्चा करण्यात येईल. तसेच याबाबत शहानिशा करून त्यानुसार आवश्यक सूचना दिल्या जातील.यासंदर्भात झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, सुनील शिंदे यांनी सहभाग घेतला.